रविवार, २६ डिसेंबर, २०१०

वाघाचे पंजे---४
"मराठीत चांगली राजकीय कादंबरी नाही हा उत्तम विश्वास !"
वाद जसे माणसांचे स्वभाव दाखवतात तसेच भाषा व बोलणे त्यामागचे बरेच काही दाखवते. मराठीत चांगले राजकारणच झाले नाही, तर तिथे चांगली राजकीय कादंबरी कशी असणार ? हिमालयाच्या हाकेला सह्याद्री आतापावेतो धावून गेलेला आहे, पण त्याला तख्ताची खुर्ची ( राष्ट्रपतीपद सोडून ) काही कधी नशीब झाली नाही. सदानंद मोरे तर म्हणतात की हे इतिहासापासून होत आले आहे कारण महाराष्ट्राने त्यावेळी गांधींना विरोधच केला. ( त्यांच्या बद्दल नितांत आदर असूनही ! ).चांगले राजकारण म्हणजे चांगल्या राजकारण्यांचे चांगले काम असे जर अभिप्रेत असेल व त्यांचे प्रतिबिंब साहित्यात पडावे असे अध्यक्षांना वाटत असेल तर ते एक उत्तम वाटणे निश्चितच आहे. ह्यामागची नंतर कळून येणारी चाहूल अशी असू शकते की नुकतेच राष्ट्रपतींबरोबर परदेश दौरे करून आलेले अध्यक्ष आता राजकारण्यांवर ( चांगल्या राजकारण्यावर ) कादंबरीच लिहिणार आहेत. जसे पवार साहेबांवर !
आता हे जंगलचे पंजांवरूनचे भाकीत कशावरून तर अध्यक्षांनी फुले, आंबेडकरांच्या बरोबरच अन्नदात्या सकाळलाही नमनाचा सलाम केला त्यावरून. शिवाय आताशी पवार साहेबांवर पुस्तके निघणे अपार महत्वाचे झाले असावे व तसे ते सुरूही झाले आहे. तर असल्या चांगल्या राजकीय कादंबरीची सुपारी खरेतर विश्वासाच्या अंगाने विचार केला तर ती विश्वासरावांना द्यायला हवी होती. पण ते झाडाझडती घेऊन पानीपत करतात असे इतिहास सांगतो ! आणि नेमाडे आपल्याच कोशात राहणारा कोसला !
खेडेगावात कांबळे वापरण्याची पद्धत आहे ती ते घोंगडे कसे पटकन कुठेही अंथरता येते, कोणावरही पांघरून टाकता येते ह्या सोयीसाठी. त्यात ते कायम खांद्यावर बाळगले तर ते भिजत घोंगडे राहात नाही. तर अशा कांबळ्यांचा चांगल्या राजकारण्यांना ज्यास्त भरवसा येणारच. आणि भरवशाची म्हैस टोणगा देत नाही. म्हणून राजकीय कादंबरी द्यावी ती अध्यक्षांनाच. तेच कांबळे उत्तम !
माणसांचे हल्लीचे कर्तृत्व कमी झाले की ती इतिहासाकडे वळतात. शालेय भांडणात सुद्धा आपला जोर कमी वाटायला लागला की नाही का आपण दम भरत, "बघ हं, तुला माहीत नाही की माझे वडील कमिशनर होते !" तर असे आपण इतिहासाकडे वळतो. एखाद्याचे शिक्षण, हुशारी पाहून दुसर्‍याला असूया वाटू लागली की मग तो म्हणायला लागतो की पूर्वी हे शिवाजीचे गुरू नव्हतेच, हटवा त्यांचा पुतळा ! हटवा त्यांचे स्टेडियम !
सदाशिव पेठ विद्वत्तेसाठी जाणवावी तर ती आता चांगल्या मटणासाठी आहे, हे असेच डाव्या हाताने दिलेली, सध्याच्या सदाशिवांची शाबासकी ठरू शकते ! हे उकरून न काढता चला पेटवू सारे रान अशी मराठी हाक कोणी देईल तर ते होईल खरे चांगले राजकारण ! एरव्ही हे ठसे दाखवतात हिंस्त्र श्वापदांचा वावर व गुरगुरणे !

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

वाघाचे पंजे---३
असंगे चे कंडोम वीक-ई-लीक्स !
योगायोगाने शब्द एकत्र जमा होत असावेत व त्याद्वारे एक स्पष्ट चित्र दिसत असावे.
मुळात विकीलीक्स चालवणार्‍याचे नाव पहा: असंगे . असंगाच्या कित्ती जवळ ! असंग का तर त्याला पकडले आहे कसे ते पहा.
ह्याचे भाषण होते स्वीडनला. संयोजक होती कोणी अर्डीन नावाची स्त्रीवादी कार्यकर्ती. हा आला. त्याच्या राहण्याची सोय तिने आपल्याच फ्लॅट मध्ये केलेली व स्वत: नातेवाईकांकडे गेली. भाषणाच्या आदल्या दिवशी रात्री आली व संग केला. त्यात कंडोम चिरकले. दुसर्‍या रात्री फोटोग्राफर बाई कोणी सोफीया नावाची तिने तर कंडोम विनाच संग केला त्याच्याशी. दोघी भाषणाला हजर. स्वीडन मध्ये म्हणे एक कायदा आहे: "सरप्राइज रेप"चा. त्यात अशी सोय आहे की स्त्रीने संभोग करताना कोणत्याही क्षणी हरकत घेतली व पुरुषाने मानले नाही तर तो "सरप्राइज रेप" होतो. शिक्षा: ७१२ डॉलर दंड. ह्या दोघींनी तक्रार नोंदविली. आणि असंगेला पकडण्य़ात आले.
‍तांत्रिकदृष्टया अभेद्य अशा अमेरिकन वकिलातींच्या पेटत्या-भिंती ( फायरवॉलस ) ओलांडून त्यांची गुपिते फोडणार्‍या वीकीलीक्स चालवणार्‍याचे कंडोम चिरकून लीक व्हावे हा किती दैवदुर्विलास ! ( तरी नशीब ह्याचे नाव मुतालीक नव्हते ! व मध्यंतरी औरंगाबादला एक कंडोम घोटाळा झाला होता, त्यातलीच निर्यात केलेली ही कंडोम असावीत.).
तर ह्या असंगेला काही अनाहूत भारतीय सल्ले !:-
असंगे ने स्वत:चे नाव बदलून संभोगे ठेवावे किंवा सत्संगे किंवा गुप्तांगे !
वीकीलीक्स हे नाव बदलून स्ट्रॉंग-शॉटस असे ठेवावे किंवा श्युअरशॉट !
भारताने, चीनने स्वीडनला चांगले, न-फाटणारे, निरोध पुरवावेत !
स्वीडनने प्रत्येक स्त्रीला एक ई-बटण पुरवावे, जे दाबले असता तात्काळ रेपचा गुन्हा नोंदवल्या जावा. ( ह्या निमित्त प्रत्येक स्त्रीचा एक हात तरी ह्या बटणावर गुंतलेला राहील. पुरुषांनी इतर बटणे स्वत:च्या जोखमीवर हाताळावीत ! )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.c0m

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

म्हणजे म्हंजे ?...वाघाचे पंजे !
आमच्या लहानपणी एक चिडवाचिडवीचा खेळ होता. कोणी "म्हणजे ?", असे विचारले की त्याला अर्थ न सांगता, चिडवायचे, "म्हणजे म्हंजे ?s s....वाघाचे पंजे !". आता "म्हणजे" शब्दाला "म्हंजे" असे लिहिले किंवा उच्चारले तर त्याला वाघाचे "पंजे" हे यमक छान जुळते हे खरे, पण मुळात, "वाघाचे पंजे" हा वाक्प्रचार कसा काय आला असेल ? काय असेल पंजे म्हणजे ?
सगळ्यात चित्तथरारक असतात शिकारीच्या किंवा जंगलातील साहस-कथा. त्यात बर्‍याच गोष्टी स्पष्ट अशा न सांगता काही अटकळी वरनं त्या ताडायच्या असतात. जसे---काल वाघ शिवारात आल्ता काय ? असा प्रश्न असेल तर वाघाच्या पंजांजे ठसे मातीत उमटले असतील तर "हे बघा....पंजे उमटलेत...ह्या दिशेला जातांना..." असे अनुभवी शिकारी दाखवतो. इतकेच नव्हे तर ह्या पंजांच्या ठशावरून वाघ नर का मादी, केवढा मोठा वगैरे अचूक माहीतीही तो देऊ शकतो. म्हणजे क्षुल्लक पंजे ते काय पण ते इतके सगळे बोलून जातात. अमेरिकेत लॉज एंजेलेस ला एका चायनीज थेटराजवळ पदपथावर तर थोर थोर नायक नायिकेच्या पायांचे ठसे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये कायमचे जपून ठेवलेले आठवते का ? आपण जेव्हा म्हणतो की "त्यांनी काळावर आपला ठसा उमटविलेला होता", तेव्हा आपण अशाच कुठल्या ठशांबद्दल बोलत असतो की काय ?
पंजांचे ठसे जसे वाघाच्या हकीकती खुलवून खुणावतात, हे ठसे जसे एक चिन्ह असते एका मोठ्या कथेचे, तसेच आपल्या जीवनात हरघडी घडत असते. फक्त कधी ही चिन्हे अर्थ सांगतात, तर कधी ही चिन्हे आपल्याला चक्रावून टाकत संभ्रमात टाकतात. तरी बरे आजकाल "बॉडी लॅंग्वेज" म्हणजे देहबोलीचे बरेच प्रस्थ माजले आहे. कोणाचा पडलेला चेहरा पाहून आपण त्याला प्रथम चहा वगैरे विचारीत ख्यालीखुशाली आधी विचारतो, जरा दमाने घेतो. तर हे जसे अशा चिन्हांनी समजते तसेच म्हणतात भाषेतही शब्द, अक्षरे, आवाज, ही एक प्रकारची चिन्हेच असतात व आपल्या अगोदरच्या लोकांनी त्याला काही निश्चित अर्थ दिलेले असतात म्हणून नुसता शब्द पाहिला की आपल्याला अर्थ बोध होतो. कधी शब्द गेलेला नसेल तर मात्र आपण अनावधानाने विचारून जातो--"म्हणजे ?" आता तुम्ही चिडवू शकता "म्हणजे म्हंजे ?...वाघाचे पंजे !" किंवा मग सरळ अर्थ सांगू शकता !
जगाच्या उपदव्यापात कधी कधी साध्या साध्या व सोप्या सोप्या चिन्हांचेही अर्थ आपल्या लक्षात येत नाहीत. खरे तर घटना अगदी स्पष्टच असतात. चिन्हे अगदी ठळक असतात. पण एखादी नवखी भाषा वाचावी तसे शब्द व ही चिन्हे आपल्याला अनोळखी होतात. त्याचा अर्थ कळेनासा होतो. जरा डोके चालवले तर ही चिन्हे तुम्हाला "वाघाचे पंजे" अगदी स्पष्ट दाखवतील. मग वाघाला कसे सामोरे जायचे किंवा कुठे पळायचे ते आपण ठरवू शकतो.
तर असेच ठरवलेय की रोजच्या दैनंदिन व्यवहारातल्या चिन्हांचा अर्थ नीट व्यवस्थित समजून सांगायचा म्हणजे तुम्हाला विचारावेच लागणार नाही की "म्हणजे ?" व आम्हालाही म्हणता येईल "हे पहा की, म्हणजे म्हंजे ?...वाघाचे पंजे !"
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com