रविवार, ११ मार्च, २०१२



 जंगलात जसे श्वापदांच्या ठशांवरून त्यांचा माग काढतात तसेच समाजात पुढे येणार्‍या संभाव्य गोष्टी काही काही सिनेमांवरूनही दिसतात. कसे ते पहा :

"कहाणी" दहशतवादाची
    "कहानी" ह्या विद्या बालनच्या नवीन चित्रपटामुळे आठवतात त्या जुन्या काळातल्या "कहाण्या" ! सत्यनारायणाच्या पूजेत आपण नेहमी ऐकतो त्या साधू वाण्याच्या कहाणी सारखीच ही कहाणी आहे, फक्त दहशतवादासारख्या नवीन विषयाची. कहाणी ह्या प्रकारात अपार विश्वास असला तरच ती आपण पूर्ण ऐकू शकतो तशीच श्रद्धा ह्या नवीन "कहानी" वर ठेवावी लागते.
    ही नवीन "कहानी" आहे दहशतवादाची. कलकत्त्यात मेट्रो मध्ये एक अपघात--स्फोट--होतो व त्यात २०० माणसे मरतात. पण हे करणारा दहशतवादी सापडत नाही. त्याचा शोध घ्यायला एक लंडनहून गरोदर बाई येते व ती कसा ह्या प्रकरणाचा छडा लावते त्याची ही कहाणी आहे. पण ह्या नवीन कहानीत किती तरी धर्माचरणाच्या गोष्टी पहायला मिळतात. त्यातली एक म्हणजे नॅशनल डेटा सेंटर नावाची जी संस्था सरकार चालवीत असते त्यातला एक तडफदार अधिकारी खान नावाचा. आपल्याकडे खरेच दहशतवाद-विरोधी जी पथके आहेत त्यात मुस्लिम अधिकारी अभावानेच असतात. खरे तर "टु कॅच ए थीफ, सेट ए थीफ" ह्या म्हणीप्रमाणे ह्या सिनेमात एका मुस्लिमालाच त्या पथकातला अधिकारी केले आहे, ते फारच कौतुकाचे आहे. पण त्याची श्रद्धा व लगन इतकी प्रभावी दाखविलीय की त्याने गरोदर विद्या बालनच्या पुढ्यात सिगरेट प्यावी, आक्रस्ताळी आक्रमक वागावे ह्याचे आपल्याला काहीच वैषम्य न वाटता उलट त्याचे धारदार वागणे जरा सुखावतेच. कहाण्यात जसा एक उपदेश असतो तसाच हा एक मोलाचा संदेश आहे की दहशतवाद-विरोधी संस्थात अवश्य मुस्लिम असले पाहिजेत.
    कहाण्यात अपार श्रद्धा ठेवण्यासाठी घटनांत सारखे काही अगम्य घडावे लागते, तसेच ह्या कहानीत कोण व कशासाठी हे सगळे करत असतो ते एक गूढ ठेवले आहे. भारताने पाकीस्तानला म्हणावे की तुमचे आतंकवादी आमच्याकडे येऊन आतंक करतात व पाकीस्तानने तसेच आपल्याबद्दल म्हणावे हे जसे कायम चालणारे गूढ असते, तसेच ह्या कहानीत सर्व गूढ ठेवले आहे. त्यातला महत्वाचा संदेश म्हणजे आतंकवादी जसे कोण मेले, किती मेले त्याचा विधिनिषेध ठेवत नाहीत तसेच आतंकविरोधी सरकारी खातेही लोकांना वापरत मरवत कारवाई करीत असते हे फार प्रभावीपणे दाखविले आहे. शिवाय शेवटी कशाचाच मागमूस न ठेवल्याने काही पुरावेही मागे राहात नाहीत. ह्याचीच वस्तुस्थितीतली उदाहरणे म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग व असीमानंद ह्यांचे भिजत ठेवलेले घोंगडे लगेच लोकांना आठवेल. तसेच बॉम्ब-स्फोटांचा तपास शेवटपर्यंत न लागणे. आता प्रत्येकानेच विद्या बालन प्रमाणे वैयक्तिक स्तरावर कोडी सोडवणे हे फारच दूरचे होईल. पण सुटकेची दिशा कहानी तिकडेच दाखवते हे कोणाच्या लक्षात येत नाही म्हणून बरे आहे, नाही तर कहानीचे सेंसॉर काही झाले नसते !

-----------------------------------------------------------

   

रविवार, २९ जानेवारी, २०१२



                                                             "अग्निपथ"ची पॅथॉलॉजी

जंगलातल्या प्राण्यांचे ठसे पाहून आपण जंगलातली श्वापदे ओळखतो. इथे तर सिनेमाभर रक्तच रक्त सांडलेले होते. मग काय, आम्हाला आयतेच रक्ताचे नमूने मिळाले व आम्ही ते पॅथॉलॉजीत देऊन त्याचा रिपोर्ट मागवला. तो असा आला :
    सिनेजगतातला अनभिशिक्त राजा, अमिताभ बच्चन, ह्याचा २२ वर्षापूर्वीचा गाजलेला सिनेमा "अग्निपथ" नुकताच झळकला आणि त्याने अपेक्षेपेक्षा ज्यास्त गल्ला व गिल्ला केला. हा सिनेमा ज्यांनी पाहिला असेल त्यांना आठवेल की सिनेमा बघताना एक मिनिटाचीही प्रेक्षकांना उसंत मिळत नाही इतके भन्नाट, पडद्यावर सारखे घडत असते आणि शेवटचा उसासा प्रेक्षक सोडतो ते थेटर सोडतानाच !
    हे नवल कसे घडले असावे ?
    अगदी मानाचा पहिला क्रमांक जातो मराठी संगीतकारांच्या जोडगोळीला. अजय-अतुल ह्यांच्याकडे. ह्या सिनेमाची गाणी तर केव्हाचीच कोरून झालेली आहेत. शिवाय सबंध सिनेमाभर जे पार्श्वसंगीत आहे ते ही नजर खिळवून ठेवायला फार मदत करणारे आहे.
    दुसरे कारण आहे दृष्टी खिळवून ठेवणारी दृश्ये आणि सेटस्‌. ह्या सिनेमाचे खिळवून ठेवण्याचे जे रहस्य आहे ते ही दृश्ये उभी करण्यामागे दडलेले आहे. हे काम आर्ट डायरेक्टरचे असते, जे आहेत साबू सिरिल. आणि ते पडद्यावर चित्रित करणारे सिनेमाटोग्राफी करणारे किरण देवहंस व रवि के चंद्रन. लहान मुले जी इंग्रजी कार्टून्स अगदी एकटक पाहतात ती करताना म्हणे बाजूला अजून एक पडदा ठेवतात व त्यावर तपासलेली, निर्विवादपणे लक्ष्य गुंतवणारी, चित्रे दाखवतात. जर तयार केलेल्या चित्रपटातनं मुलांच लक्ष ह्या पडद्यावर गेलं, तर नवा चित्रपट दृष्टी खिळवणारा नाही व तो मग परत शूट करतात, अशी तिकडे पद्धत आहे, म्हणतात. अगदी त्याच पद्धतीने "अग्निपथ" शूट केलेला असावा असा संशय येतो. मास्तरला ज्या झाडावर फाशी देण्याचे दाखवतात ते झाड व समुद्रावर जाणारा हा कडा एक अप्रतीम दृश्य आहे. आणि हेच दृश्य म्हणूनच ह्या सिनेमाचे संकेतस्थळ आहे त्यावर रेखाटलेले आहे. अशीच दिसण्याबाबतची खबरदारी ह्या सिनेमातल्या कलावंतांच्या दिसण्यातही घेतलेली दिसते. संजय दत्तचा कांचा इतका राक्षसी उभारला आहे की स्वत: संजय दत्त म्हणतो की हा सिनेमा मुलांनी बघू नये. त्याचे शरीरही अक्राळ-विक्राळ दाखवण्याचे कसब मोठे वाखाणण्यासारखे आहे.
    तिसरे महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे, दिसण्याचा मरातब राखण्याचे. म्हणतात की अगोदर हिरोची भूमिका अभिषेक बच्चनला देण्यात आली होती. ती मागे घेऊन ह्रतिक रोषनला घेण्यानेच सिनेमा अर्धी बाजी मारतो. कारण आज दिसण्यात ह्रतिकला हरवेल असा देखणा नट दुसरा कोणी नाही. हेच तत्व ठेवून मग प्रियांका चोप्रा, कत्रीना कैफ, ह्यांची नेमणूक देखणी ठरते. त्याच बरोबर हिरोची बहीण म्हणून कोणी कनिका तिवारी ह्या नवीन आणि भोळ्या चेहर्‍याच्या नटीला निवडणेही अपार कौतुकाचे आहे. असेच कौतुक ऋषि कपूरला निवडण्याचे करावे लागेल. कारण २२ वर्षापूर्वीच्या चित्रपटात अशीच भूमिका मिथुन ने केलेली होती.
    सिनेमाचे दिग्दर्शन करण मलहोत्रा ह्यांनी केलेले असून ते अतिशय देखणे आहे. हा मलहोत्रा जुन्या सिनेमाचा सहाय्यक होता व त्यामुळे त्यात काय काय घातले असता सिनेमा बघणीय होईल ह्याची त्यांना चांगलीच जाण आहे असे दिसते.
    सिनेमात जो प्रचंड "खून-खराबा" आहे त्यामुळे त्याच रक्ताचे नमूने घेऊन आम्हाला वरील पॅथॉलॉजीची चाचणी करता आली हे तुमच्या लक्षात आले असेलच.

-----------------------------------------------------------------------------