शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

वाघाचे पंजे-----७
शिवानंदांचे शिव शिव !
शिवानंदन ह्यांची ख्याती चांगलीच आहे. त्यामुळे ते परवा बोलले ते का व कशासाठी हा प्रश्न पडतोय का ? तर जंगलात आपण जसे आधी वाघाच्या पंजांचे ठसे तपासतो व मग कोणता वाघ कुठे असेल ते सांगतो, तसे काही "ठसे" पाहू.
सोनवणे ह्या अधिकार्‍याला तेल-माफियावाल्यांनी का जाळून मारले ते एव्हाना आपल्याला कळलेच आहे. तेल-माफिया अस्तित्वात आहे व चांगला रगड धडधाकट आहे, हे तर आपल्याला पटलेलेच असते. तशात सोनवणे हे काही फार धुतल्या तांदुळाच्या प्रतिमेचे होते ( अशी काही प्रतिमा असते ह्यावरच सध्या संशय वाटतो आहे ! ) अशातले नाही. तेव्हा ते वसूलीसाठी गेले असावेत हेही संभवनीय आहे. त्यातून हे जळित प्रकरण झाले असावे. असे आपल्याला वाटते ना वाटते तोच शिवानंदन ह्यांनी दुसरेच अस्त्र परजले आहे. ते म्हणतात मुळात ह्या तेल-वाळू-माफियांविरुद्ध तुम्ही कारवाई करू नका असा सरकारनेच पोलिसांना आदेश काढलेला आहे. म्हणजे हे कुरण कलेक्टर व महसूल अधिकार्‍यासाठी राखीव आहे, असाच त्याचा सरळ अर्थ निघतो. मग पोलीसांनी धाडी टाकल्या, काही लोकांना पकडले अशा बातम्या प्रसृत झाल्या त्या कशा ? तर शिवानंदन म्हणतात, अहो तो सगळा बनाव होता ! तुम्हा आम्हाला बनवण्यासाठी !
आता राजकारणी असे बनेल आहेत, हे तर आपल्याला माहीतच आहे. ते तर आपल्याला लगेच पटतेही. पण हे शिवानंदन साहेब, इतके बेधडक कसे बोलताहेत ? त्यांना भीती कशी नाही वाटत ?
तर ही बातमी बघा : आता २८ फेब्रुवारीला शिवानंदन साहेब निवृत्त होत आहेत !
चला निवृत्त होताना का होईना वाघाला तो वाघ होता हे कळले हेही नसे थोडके !

-----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

वाघाचे पंजे---६
ई-जप्त !
रस्ता कुठे जात नाही नि येत नाही, पण आपण म्हणतो हा राजरस्ता आहे. हा तुम्हाला राजाकडे घेऊन जाईल. राजा धूर्त असेल तर तो रस्त्यांच्या चौकींवर, वळणांवर नाकेबंदी करील व सर्वांना परतवून लावील व मग आपण जो राजरस्ता धरला होता तो आपल्याला परत आणून सोडेल. रस्त्यावर !
रस्ता कधी लाभतो तर कधी लाभतही नाही. महात्मा गांधींनी "चले जाव" म्हणून आपल्याला रस्त्यावरच खेचले होते व त्याला इंग्रजही घाबरलेच होते. मुंबईत एक फाटका माणूस, जॉर्ज फर्नांडिस, हवे तेव्हा लोकांना रस्त्यावर आणी , बंद पुकारी व हवे ते पदरात पाडून घेई. ज्या रस्त्याने त्याला हे मिळवून दिले त्यानेच मग कंटाळून त्याच रस्त्यावरून त्याला पिटाळलेही. इतके की आजकाल कोणीही मोर्चे काढतच नाही. रस्ता अडवून पाहणारे शेतकरी तर आजकाल रस्त्यावर न येता, शेतातच एंड्रीन पिऊन....
आता ईजिप्तचे रस्ते हे अनुभवू लागले आहेत.
एक बाई व्हीडीओ पाठवते लोकांना की आता खूप झाले मी चाललेय तहरीर चौकात, मुबारक गेले पाहिजेत म्हणायला, तुम्ही पण या आणि मग १५ दिवस लाखो माणसं तिथे जातात, मुबारक म्हणतात बर, बर आता मी राज्य सोडतो. तर हे ईजिप्त प्रकरण तसे खूपच पेटले म्हणायचे ! पण थांबा ! अमेरिकेला मिलिटरीला काहीतरी विकायचे असेल, तेल घ्यायचे असेल, जगाला त्याचे काही नसेल व पाहता पाहता मिलिटरीतला दुसरा कोणी येईल व ईजिप्तचे रस्ते परत पिरॅमिडसारखे ममीज मिरवायला लागतील.....
भाजपला वाटते समजा असेच आपण रस्ता-भरून माणसे रस्त्यावर आणली तर सोनियांना पायउतार करू शकू ? पण रस्त्याचे मानसशास्त्र मोठे अजब असते. नुकतेच त्यांनी काश्मीरात तिरंगा मोर्चा काढला होता. रस्ता बर्‍यापैकी भरलेला होता. पण काय झाले ? भारतातला रस्ता आता थकला आहे. गुज्जर लोकांनी कित्येक वेळा रस्ते अडवून भरवून झाले, पण आरक्षण काही त्यांना मिळत नाहीय. कारण रस्ता आता थकला आहे. इराणमध्ये हे लोकांनी कित्येक महिने करून पाहिले . शेवटी तिथले रस्तेही थकले.
रस्त्यावरचा माणूस हुशार ( स्ट्रीट स्मार्ट ) होतोच. रस्ताच त्याला स्मार्ट करतो. मुंबईत रोजच लाखो माणसं इकडचे तिकडे जातात. त्यांनी ठरवून ते केले तर कोणाच्या लक्षातही येणार नाही. स्मार्ट माणूस न जाऊनच ( बंद ) काय पाहिजे ते मिळवेल. त्याला माहीत आहे की समजा तो म्हणाला की सोनियाला घालवा, तर त्या जाऊन दुसरे कोणी तरी येईल, आपण मात्र आहोत तिथेच रस्त्यावर राहू. ह्या भरवशावरच तो आता कोणत्याही रस्त्यावर उतरत नाहीय. रस्ता थकलाय, रस्त्यावरचा माणूसही थकलाय !
रस्ता "प्रकरण" लवकरच जप्त होईल, तेव्हाच तो खरा ई-जप्त होईल ! ई-जप्त तुम आगे बढो, हम तुम्हारे ....


-----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com