रविवार, १० एप्रिल, २०११

जेपीएल चा वर्ल्ड-कप
अखेर जेपीएल चा वर्ल्ड-कप अण्णाज फास्ट-लोकपाल्स नी जिंकला ! अहो, जेपीएल म्हणजे जंतरमंतर-पाल-लीग ! फायनल होती मनमोहन्स अडियल्स विरुद्ध. तसे अण्णाज फास्ट लोकपाल्स हे अंडर-डॉग्जच होते. राळे-गण-सिद्धी हे कसे पाकीस्तानच्या रावळ-पिंडी सारखेच वाटते. पण तिथले अण्णा हे खरेच फास्ट बोलर आहेत. रावळपिंडी एक्सप्रेस पेक्षा त्यांचे फेकणे भारी असल्याने महाराष्ट्रातले लोक त्यांना राळेगण-एक्स्प्रेस असेच म्हणतात. त्यांनी आत्तापर्यंत इतकी फेकाफेक केलेली आहे व इतके फास्टस केलेले आहेत की "मॅक्डोनाल्ड" ह्या आंतर-राष्ट्रीय फास्टफुड चेनने त्यांना आपले ब्रॅंड-ऍंबॅसेडरच केले आहे. ( धिस इज रियली ए फास्ट वन ! आणि ह्यात एकप्रकारचा सूक्ष्म व मनमोहक अंतर्विरोध आहे तो असा, की उपवास करणारा हा फास्टफुडचा ब्रॅंड-ऍंबॅसेडर !).
मनमोहन्स अडियल्स ह्यांना जंतर-मंतर हा व्हेन्यूच पसंत नव्हता. त्यांचे म्हणणे तिथले पिच इतके अंडर-प्रिपेअर्ड आहे की तिथे काहीही फेकले तर ते खस्सकन उसळते ! आणि मग कपाळमोक्ष ! त्यापेक्षा लोकसभेचे पिच कसे गुळगुळीत ! ६२ वर्षे वापरून वापरून चिकने झालेले . तिथे डेडली बाऊन्सर्स टाकले तरी ते अंडर-आर्म टाकल्यासारखे चोपता येतात. पण अण्णाज फास्ट लोकपाल्सची तिकडे मेंबरशिप नाहीय, म्हणून त्यांना मज्जाव आहे. मग मॅच कशी होणार ? मग असे डील झाले की अण्णाज फास्ट लोकपाल्स जंतर-मंतरला खेळतील व रिव्हयू सिस्टिमने मग टू-जी-प्लेयर-सिबल, ह्यांच्या होमग्राऊंडवर, मनमोहन अडियल्स आपली ताकद दाखवतील.
पहिलाच चेंडू राळेगण-एक्सप्रेसचा, शरद पवारांवर उसळला . पवार जागच्या जागी उभे. थोडे पुढे झुकतात तोच केजरीवालने स्टंप्सच उडवले. झाले, अण्णाज नी अपील केले, स्टंप्ड ! सिबलच लेग अंपायर होते. त्यांचे म्हणणे पडले की पवारांनी अटेम्प्टच केला नाही, तर आऊट कसे काय ? शिवाय सरकार कोणाचेही असले तरी पवार नेहमीच इन असतात, आऊट कधीच होत नाहीत, असा नियमच आहे . फास्ट लोकपाल्स नी त्यांचा पहिला रिव्ह्यू वापरला. मोठ्ठया पडद्यावर स्लो-मोशन मध्ये रिव्हू सुरू झाला. अण्णांचा पाय रेषेच्या आतच होता, त्यामुळे तो नो-बॉल तर नव्हता. पण बॉलचा रोख होता लव्हासा, बलवाचे विमान, गोयंका ह्या तीन टारगेटसवर (स्टंप्स ) . बॉलचा रोख त्याच लाइनीत होता, जसे कोणावर हमखास व डायरेक्ट आरोप असावेत तसा. अंपायर सिबल, चिकी चघळत, मेन थर्ड अंपायरेस कडे आशाळभूतपणे बघत होते. अंपायरेस मॅडम दक्षिणेत निवडणुकीच्या दौर्‍यावर ! त्या तिथेच एक कटाक्ष टाकत विचार करू लागल्या, द्यावे का देऊ नये,... असे सारखे होत होते. पवारांना कधी नव्हे तो झटका आला व ते सरळ तंबूकडे चालू लागले ! पहिली विकेट तर पडली !
मॅडम दिल्लीत नाहीत, सिबल काहीतरी हायटेक ( टू-जी, थ्री-जी, जिजी र जिजी र जी जी ) बोलताहेत, पवार रुसलेत, आणि पब्लिक अण्णांना चियर करते आहे, ह्या सगळ्या गोंधळात मनमोहन्स अडियल्स तर्फे कोणाला पाठवावे ते ठरेना. सिबल म्हणू लागले मीच खेळतो व अंपायरही मीच ! मग मनमोहन म्हणू लागले, आपण मॅचच सोडू , मग अण्णाची सेंच्युरी तरी होणार नाही !. सिबल म्हणू लागले, पण तसे लिहून देऊ नका . केजरीवाल, अग्निवेश, भूषण, बेदी, म्हणू लागले की नाही, जेपीएलचा वर्ल्ड कप आम्हाला पाहिजे व त्यासाठी तुम्हाला तशी नोटिफिकेशन ( मॅच सोडल्याची ), द्यावीच लागेल. अमेरिकेशी अणू-करार-लीग खेळताना नाही का तुम्ही लेखी दिले, बिल पास करवून घेतलेत ? मनमोहनांनी थर्ड अंपायरेस ला परत दक्षिणेत कॉल दिला. त्यांना वाटले, आपण मॅच सोडली तर मॅडम खूपच चिडतील. तर झाले विपरीतच. इकडे मॅडम खूशच होत्या. त्यांना तिकडे दक्षिणेत, राजाची दक्षिणा मिळालेली होती. त्या म्हणाल्या... दक्षिणा सलामत तो मॅच पचास ! त्या म्हणाल्या,... द्या की लिहून. येतं ना, लिहिता... गुरुमुखीत ?
जेपीएलचा वर्ल्ड कप अशा रितीने अण्णांच्या फास्ट लोकपालसनी उचलला. त्याला ओठ लावलेले अनेक फोटो काढल्या गेले. पवार म्हणू लागले, हा काही खरा कपच नाहीय ! खरा कप लव्हासालाच आहे ! लगेच सर्वच वाहिन्यांवर हायलाईटस सुरू झाले. मॅच इतक्या लवकर संपली की कित्येकांना ती नीट पाहताच आली नव्हती. ते डोळ्यात तेल घालून पाहू लागले व त्यांना कळू लागले की आयला...ही पण फिक्स्ड !


-----------------------------------------------------------------------------------------

४ टिप्पण्या:

  1. लायसेन्स राज मागच्या दाराने आणण्याचा हा अण्णांचा प्रयत्न तर नाही?

    उत्तर द्याहटवा
  2. नवीन " वाघाचे पंजे " एकदम झक्कास!
    "जेपीएल"पेक्षा "एसील"(अँटी करपशन लीग) कसे वाटते?

    उत्तर द्याहटवा
  3. वाघाचे पंजे फारच खोलवर रुतले हो..... भालेराव साहेब ,फारच मस्त. ओरबाडे तसेच राहून द्यात तुमचा लोगो म्हणून.

    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. म्हणजे, म्हणजे (वाघाचे पंजे) खरच अफलातून. मला वाटते कि अग्र्लेखासारखे रोजच्या रोज खरमरीत भाष्य वाचायला आवडेल. सध्या खूपच घटना घडताहेत. एक अधाशी विचार वजा विनंती.

    प्रभंजन

    उत्तर द्याहटवा