सोमवार, २ मे, २०११

वाघाचे पंजे----११
पासवर्डस्‌ : अरे ला का रे !, फिर मिलेंगे !
ओसामा बिन लादेनला ओबामाने कसे पकडले, मारले व समुद्रतळाशी कसे दफन केले हे वाचून भारतीय मंत्रीगण थरारून गेले. मॅडमचा निरोप आला की ह्या संबंधी एक तातडीची बैठक बोलावली आहे व त्यात युवराज काही महत्वाचे सांगणार आहेत, तेव्हा या बर, पटकन !
मॅडमची निळी साडी, सरदारांची मॅचिंग निळी पगडी, सिबलांच्या कपाळावर छोटी पटटी, पांढरे-फेक केसावर उठून दिसणारा सलमान खुर्शीदांचा काळा चष्मा, संरक्षण मंत्र्यांचा दाक्षिणात्य पोशाख, चिदंबरांचे शुभ्र मुंडु, आणि हे काय ह्या सभेत अण्णा हजारे कसे ? तेच युवराज सांगू लागले : आपणही अमेरिकेसारखे ऑपरेशन करायचे, चार हेलिकॉप्टर भरून कमांडो न्यायचे व कराचीहून दाऊदला मुसक्या बांधून घेऊन यायचे. बोला कोण नाही म्हणताहेत ? सगळे हो हो करायला लागले. सगळे अण्णांकडे पहात मनमोहनांना नजरेने विचारू लागले, हे कसे इथे ? ह्या ऑपरेशनमध्येही घोटाळा झाला की काय ?
मनमोहन म्हणू लागले, यह लंबी कहानी है. ( त्यांच्या कहाण्या सफळ व लंब्याच वाटतात ! ). प्रॉब्लेम असा आहे की आपले हेलिकॉप्टर्स सध्या जरा भरकटू लागले आहेत.त्यांना चांगल्या सपोर्टची गरज आहे. शिवाय ते पाकिस्तान्यांना रडारवर दिसले नाही पाहिजेत. त्यासाठी इस्त्रोच्या, देव्हास कंपनीचे जे ट्रान्स्पॉंडर्स बसवले आहेत, ते त्यांना काही काळ बंद ठेवावे लागतील. १९९५ मध्ये जसे पुरुलिया ड्रॉप मध्ये मिलिट्रीचा रडार जसा बंद ठेवला होता तसा. आता ही व्यवस्था बलवाच्या एका परदेशी कंपनीकडे आहे व त्यासाठी अण्णाजींना बोलावले आहे. अण्णा आणि बलवा, यह कैसा संबंध ? त्यावर मॅडमच म्हणाल्या, नही उनका तालुक बलवासे नही, लेकिन पवारजीसे, और पवारजी का गोयंकासे है, उसके लिये उन्हे बुलाया है. पण अण्णा तर पवारांच्या विरुद्ध . ते नाही म्हणाले तर ? तर आपण त्यांच्या भूषणावह पितापुत्रांना नाही म्हणू. बर, मग त्यांनी काय करायचे ? तर तिहारला जाऊन गोयंकाला निरोप द्यायचा की तुझ्या कंपनीला सांग रडार बंद ठेव आठ-एक तासासाठी. केव्हा व कसा रडार बंद ठेवायचा ते पवार सांगतील. पवार का ? तर दाऊद, त्याचा गुटख्याचा धंदा, ९३ चे स्फोट, पुणे, व त्या लाइनमधली जाणकारी वगैरेसाठी पवार. आता गांधीजींनी ह्याला मान्यता नसती दिली , पण व्यापक देशहिताचा विचार करता दुसर्‍या गांधींना हो म्हणायला हरकत नाही, शिवाय ह्याने भूषणांची सोय होते आहे असे समजून, अण्णा राजी झाले.
झाले ! सर्व निश्चित झाले ! ऍंटनीनी कमांडो वगैरेची व्यवस्था केली. सगळे आता श्वास रोखून ऑपरेशन कधी होते व आबा दाऊदला कधी ताब्यात घेतात त्याची वाट पाहू लागले. पश्चिम बंगालहून मॅडम व युवराज विचारणा करू लागले की काय झाले ? केव्हा ? अण्णा म्हणू लागले, मी बारामतीला विचारतो. इकडे पवारांना काहीच माहीती नाही. तेव्हढ्यात बारामतीचा ऑपरेटर लाईनवर आला व विचारू लागला की मिलिट्री प्रथेनुसार ते पासवर्ड विचारताहेत. काय सांगायचा पासवर्ड ? समोर अजीतदादांकडे पहात साहेब म्हणाले "पासवर्ड : अरे ला का रे "
ऑपरेशन सुरू झाले, फत्तेही झाले, दाऊद भेंडीबाजारात येऊनही पोचला, आबांकडे डिएनए रिपोर्टही आला, नेव्हीचे पाणबुडे समुद्रतळाकडे कसे जायचे त्याची आखणी करु लागले, तेव्हढ्यात दिग्विजय सिंगांचा तातडीचा निरोप आला की आत्ताच राष्ट्रपतींचा माफीनामा आलाय की सर्व मुसलमान कैद्यांना माफी देण्यात आली आहे, अफझल गुरू, दाऊद... वगैरे. तेव्हा आता इतमामाने दाऊदला परत पाठवायची व्यवस्था करा !
आणि टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज येऊ लागली "यूपीए-३"चा प्रचंड विजय. ४०० सीटस, कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. दाऊदला पकडले म्हणून हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड मते दिली आणि त्याला सोडले म्हणून अल्पसंख्यांकांनी ! दाऊद्ला परत पाठविणारे हेलिकॉप्टर निरोपाची वाट पहात होते. वैमानिकाने विचारले काय पासवर्ड ? आता पासवर्ड होता : फिर मिलेंगे !

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

1 टिप्पणी: