रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे----१८

मधुमेह अधिक बालदिन

लग्नसंमारंभाच्या वेळेस जेव्हा लगबग असते व गाड्या व माणसे यांची योजना करतात तेव्हा हमखास लहान पोरांना काय, कुठल्याही गाडीत कोंबतात. पूर्वी जसे म्हणत गाड्याबरोबर नळाची यात्रा. ( बैल गाड्यांच्या ऍक्सल वर चाक फिरायचे त्याला वंगण, एक प्रकारचे ऑइल, लावण्यासाठी ते एका नळकांड्यात ठेवून ते गाडीला अडकवीत व अशी नळाला गाडीबरोबर यात्रा घडे ! ). असेच ह्यावर्षीच्या बालदिनाचे झाले असावे. पूर्वी कसा बालदिन एकटा स्वतंत्र येई. मग त्याचे लाडही स्वतंत्र व खास होत असत. पण ह्या वर्षी मधुमेह-दिन व बालदिन एकत्रच आले आहेत. हे म्हणजे कोणी तरी लहान मूल समजून बालदिनाला मधुमेह-दिनाबरोबर ढकलले असावे. बालदिन काय तर फुगे, फुले, चॉकलेट, वगैरे. ते आता मधुमेह-दिनाबरोबर करूयात की !
चाचा नेहरूंचा हा खरे तर वाढदिवस. १४ नोव्हेंबर. पण त्यांना मुले आवडत म्हणून बालदिन करायची प्रथा सुरू झाली. चाचा नेहरूंना मुले खरेच आवडत हे मात्र नक्की. कारण मी तिसरीत असताना हे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावेळी मी हैद्राबादी होतो. माझी आई आजारी होती. तिला डॉ.मेलकोटे ह्यांच्या सॅनेटोरियम मध्ये ठेवलेले होते. हे डॉ.मेलकोटे हैद्राबादचे आरोग्यमंत्री होते व नेहरूंसारखेच लाल-बुंद गोरे होते. त्यांच्या सॅनेटोरियमला चाचा नेहरू भेट देणार होते. हे मला हॉस्पिटलच्या नर्सेस, दायांकडून कळले आणि मी लागलीच तिथल्याच एका गुलाबाच्या झाडावरचे टपोरे गुलाबाचे फूल तोडले व सगळेजण जिथे नेहरूंची वाट पहात होते तिथे उभा राहिलो. नेहरू आले व एकच लगबग झाली. मोठी माणसे अंदाजाने लगेच पुढे झाली. मी दिसेनासाच झालो होतो. मला वाटले आता कसले दिसतात आपल्याला चाचा नेहरू व आपण त्यांना कसे देणार गुलाबाचे फूल ? पण ह्या गर्दीला मध्येच चिरीत चाचा नेहरूच माझ्याजवळ आले, थोडे वाकले व मला फूल द्यायचे सुचायच्या आत स्वत:च त्यांनी ते फूल स्वीकारले. एका क्षणाचाच प्रसंग. पण आज साठ वर्षे तो माझ्या स्मरणात लख्ख स्पष्ट दिसतो. त्या माणसाचे लहान मुलांचे प्रेम खरेच मोठे प्रांजळ व निर्मळ होते.
असल्या चाचा नेहरूंचा वाढदिवस मधुमेह-दिनाच्या दिवशी यावा ह्यात काही तरी अनामिक संकेत असावा. मधुमेह म्हणतात की अनुवंशिक असतो. आपल्या आईवडिलांपैकी कोणाला तो असला तर आपल्यालाही तो होऊ शकतो. माझ्या आईला मधुमेह होता. म्हणून की काय दोन वर्षांपूर्वी मलाही तो झाला. मधुमेहात आपण जे अन्न खातो त्यातली उर्जा घेण्यात येताना ज्या साखरेचे उर्जेत रूपांतर व्हायला हवे ते पूर्ण प्रमाणात न होता ज्यास्तीची साखर आपल्या शरीरात, रक्तात तशीच साठून राहते. मग त्याचा दुष्परिणाम होतो. तर अशा मधुमेहाचे व चाचा नेहरूंचे काय संबंध असावेत ?
भारताच्या जनतेने जवाहरलाल नेहरूंवर अतोनात प्रेम केले. त्यांना जवळ जवळ सगळे खूनच माफ केल्यासारखे, जनता त्यांच्यावर प्रेम करी. इतके की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला विरोध केला तरी जनतेने त्यांना अपशब्द कधी दिले नाही. निदर्शने जरूर केली. त्यांना महाराष्ट्राचे वेगळे राज्य निर्माण करण्यास भाग पाडले पण त्यांचा दुस्वास नाही केला. असेच त्यांच्या राजनीतीचेही लोकांनी कौतुकच केले. हे कौतुक, लाड इतके झाले की जनतेलाच ह्या गोडपणाने जणु मधुमेहाचा त्रास व्हायला लागला. आजही नेहरूंच्या कित्येक गोष्टी जनतेला सतावीत असतात. पण मधुमेह देणार्‍या आईवडिलांना जसे आपण दूषण देत नाही तसेच नेहरूंना कोणी फारसे वावगे बोलत नाहीत व त्यांच्यावर आजच्या मधुमेहाचे खापर आपण फोडत नाही.
जंगलात जसा सगळीकडे हल्लकल्लोळ असला तरी श्वापदांच्या ठशांवरून लोकांना त्यांना ओळखावे लागते, त्यांचा सुगावा काढावा लागतो त्याच प्रमाणे राजकारणातल्या असंख्य मतभेदात काही अनामिक ठशांवरून आपापले अर्थ काढावे लागतात. जसे राजकारणातल्या अनेक वादावादीत नेहरूंचे स्मरण त्यांच्या लहान मुलांच्या निर्वाज प्रेमामुळे आजही आपल्याला सुखकारक वाटते.त्यांच्या असंख्य घोडचुकींमुळे देशाला झालेला मधुमेह त्यांच्या मुलांवरच्या प्रेमापोटी आपण सुसह्य समजतो.
म्हणजे ? म्हणजे ?.....वाघाचे पंजे ?

------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा