गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

धाकदपटशा


वाघाचे पंजे---१७
धाक-दपटशा !
प्रशांत भूषण ह्यांच्यावर, कॅमेर्‍यासमोर, तीन तरुणांनी मारहाण केली आणि एक मूलभूत सत्य सर्वांसमोर नागडे झाले. कितीही संस्कार संस्कार म्हटले तरी धाक-दपटशा हाच आपला मूळ स्वभाव झाला आहे.
लहानपणी वडिलांचा धाक इतका असतो की त्यापायी मुले त्यांच्याशी शक्यतो कमीच बोलतात. आई हट्ट केला की बाथरूम मध्ये कोंडून घालते म्हणून लहान मुले कोवळ्या वयातच धूर्त होऊ लागतात. शाळेत मास्तर त्यांच्या छडीचा प्रसाद देतात म्हणून अभ्यास करावा लागतो. तरुण पणात शाळा-कॉलेजात जरा दादागिरी नाही केली तर मग ते तारुण्य काय कामाचे ? राजकारणात तर ज्याचा धाक त्याचेच राज्य ! खरे तर सोनिया गांधी आजारी होत्या, भारताबाहेर ऑपरेशनसाठी गेल्या होत्या, तेव्हा सत्तापिपासूंना बंडखोरी काही अवघड नव्हती. पण उगाच रिस्क नको बुवा, कलमाडी बघा ना, बसलेत आत तिहार जेलात, इतके जवळचे असूनही. हा धाक कसा मतलबी लोकांना सरळ सुतासारखा ठेवतो. साधे पोलीसांचेच बघा. भारतात ( २००६ सालच्या सरकारी आकड्यांप्रमाणे ) दर एक लाख लोकांमागे पोलीस आहेत केवळ १४३. आता एक लाख लोक शिवाजी पार्कावर जमले तर केवढा मोठा समूदाय होतो ते आठवा. एवढ्या लोकांनी ठरवले तर १४३ पोलीसांना ते सहजी पळता भुई कमी करून सोडतील. पण त्यांचा धाक असा असतो की एवढेच पोलीस एक लाख लोकांना आवरू शकतात. सिग्नलवर मी सिग्नलच्या आधी कोणी पोलीस आडोशाला आहे का हे पाहतो व नसेल तर बेधडक सिग्नल तोडतो. पोलीस असेल तर मात्र निमूटपणे उभा राहतो. धाकाचे केव्हढे हे सिग्नल !
प्रत्येक वयस्कर माणसाला विचारा, त्याने त्याच्या आयुष्यात केव्हाना केव्हा तरी मार खाल्लेला असतो व मार दिलेलाही असतो. मागे राजीव गांधीच्या काळात प्रणब मुखर्जींना असेच एकदा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बदडून काढले होते. नवे सरकार स्थापन होण्याच्या काळात सर्वच पक्ष आपापल्या सभासदांना पंचतारांकित हॉटेलात कोंडूनच ठेवतात. अशी तर आपली लोकशाही ! बाळासाहेबांचा दराराच अजून लोकांना शिवाजी पार्कावर भाषणाला ओढून आणतो. "स्टेट ऑफ फियर" नावाच्या मायकेल क्रिश्टनच्या कादंबरीत तर लोकांच्या भीतीपोटी सरकारे राज्य कशी करतात हेच खुबीने दाखवले आहे. माणसाच्या सगळ्या व्यवहारात भयाचे असे साम्राज्यच स्थापन झालेले असते. हाच आपल्यावरचा धाक-दपटशा !
गांधींची अहिंसा किंवा सध्या अण्णांची अहिंसा चालते आहे तीही तिच्या धाकामुळेच. उपोषण करतो म्हटले की सरकार घाबरते, ते लाखो लोक एकत्र येतील, बोंबाबोंब करतील ह्या धाकानेच सरकार नमते आहे. अहिंसाही कधी कधी हिंसा करते ती अशी ! काश्मीरचा प्रश्न त्यांनी अजून लोंबकळता ठेवलाय तो अशाच हिंसक धोरणांनी व आपणही तेव्हढ्याच हिंसेच्या प्रत्युत्तराने. काश्मीरातून पंडितांना हकलून देण्यात आले होते ते धाकानेच व आजही त्यांच्यावर थोडाफार धाक आहे तो लष्कराचाच ! धाक-दपटशा असा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे !
जंगलात एक बरे असते. इथला कायदाच मुळी, बळी तो कान पिळी. त्यामुळे इथे ठशावरून सिंहाचा ठाव घेताना त्याच्या धाकाचाच आपण अंदाज घेत असतो. आपल्या स्वभावातले धाक-दपटशाचे हे ठसे मात्र आपण आपलेच पाहून खात्री करायला हवी ! म्हणजे ? म्हणजे, वाघाचे पंजे !
-------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा