वाघाचे पंजे---१७
धाक-दपटशा !
प्रशांत भूषण ह्यांच्यावर, कॅमेर्यासमोर, तीन तरुणांनी मारहाण केली आणि एक मूलभूत सत्य सर्वांसमोर नागडे झाले. कितीही संस्कार संस्कार म्हटले तरी धाक-दपटशा हाच आपला मूळ स्वभाव झाला आहे.
लहानपणी वडिलांचा धाक इतका असतो की त्यापायी मुले त्यांच्याशी शक्यतो कमीच बोलतात. आई हट्ट केला की बाथरूम मध्ये कोंडून घालते म्हणून लहान मुले कोवळ्या वयातच धूर्त होऊ लागतात. शाळेत मास्तर त्यांच्या छडीचा प्रसाद देतात म्हणून अभ्यास करावा लागतो. तरुण पणात शाळा-कॉलेजात जरा दादागिरी नाही केली तर मग ते तारुण्य काय कामाचे ? राजकारणात तर ज्याचा धाक त्याचेच राज्य ! खरे तर सोनिया गांधी आजारी होत्या, भारताबाहेर ऑपरेशनसाठी गेल्या होत्या, तेव्हा सत्तापिपासूंना बंडखोरी काही अवघड नव्हती. पण उगाच रिस्क नको बुवा, कलमाडी बघा ना, बसलेत आत तिहार जेलात, इतके जवळचे असूनही. हा धाक कसा मतलबी लोकांना सरळ सुतासारखा ठेवतो. साधे पोलीसांचेच बघा. भारतात ( २००६ सालच्या सरकारी आकड्यांप्रमाणे ) दर एक लाख लोकांमागे पोलीस आहेत केवळ १४३. आता एक लाख लोक शिवाजी पार्कावर जमले तर केवढा मोठा समूदाय होतो ते आठवा. एवढ्या लोकांनी ठरवले तर १४३ पोलीसांना ते सहजी पळता भुई कमी करून सोडतील. पण त्यांचा धाक असा असतो की एवढेच पोलीस एक लाख लोकांना आवरू शकतात. सिग्नलवर मी सिग्नलच्या आधी कोणी पोलीस आडोशाला आहे का हे पाहतो व नसेल तर बेधडक सिग्नल तोडतो. पोलीस असेल तर मात्र निमूटपणे उभा राहतो. धाकाचे केव्हढे हे सिग्नल !
प्रत्येक वयस्कर माणसाला विचारा, त्याने त्याच्या आयुष्यात केव्हाना केव्हा तरी मार खाल्लेला असतो व मार दिलेलाही असतो. मागे राजीव गांधीच्या काळात प्रणब मुखर्जींना असेच एकदा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बदडून काढले होते. नवे सरकार स्थापन होण्याच्या काळात सर्वच पक्ष आपापल्या सभासदांना पंचतारांकित हॉटेलात कोंडूनच ठेवतात. अशी तर आपली लोकशाही ! बाळासाहेबांचा दराराच अजून लोकांना शिवाजी पार्कावर भाषणाला ओढून आणतो. "स्टेट ऑफ फियर" नावाच्या मायकेल क्रिश्टनच्या कादंबरीत तर लोकांच्या भीतीपोटी सरकारे राज्य कशी करतात हेच खुबीने दाखवले आहे. माणसाच्या सगळ्या व्यवहारात भयाचे असे साम्राज्यच स्थापन झालेले असते. हाच आपल्यावरचा धाक-दपटशा !
गांधींची अहिंसा किंवा सध्या अण्णांची अहिंसा चालते आहे तीही तिच्या धाकामुळेच. उपोषण करतो म्हटले की सरकार घाबरते, ते लाखो लोक एकत्र येतील, बोंबाबोंब करतील ह्या धाकानेच सरकार नमते आहे. अहिंसाही कधी कधी हिंसा करते ती अशी ! काश्मीरचा प्रश्न त्यांनी अजून लोंबकळता ठेवलाय तो अशाच हिंसक धोरणांनी व आपणही तेव्हढ्याच हिंसेच्या प्रत्युत्तराने. काश्मीरातून पंडितांना हकलून देण्यात आले होते ते धाकानेच व आजही त्यांच्यावर थोडाफार धाक आहे तो लष्कराचाच ! धाक-दपटशा असा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे !
जंगलात एक बरे असते. इथला कायदाच मुळी, बळी तो कान पिळी. त्यामुळे इथे ठशावरून सिंहाचा ठाव घेताना त्याच्या धाकाचाच आपण अंदाज घेत असतो. आपल्या स्वभावातले धाक-दपटशाचे हे ठसे मात्र आपण आपलेच पाहून खात्री करायला हवी ! म्हणजे ? म्हणजे, वाघाचे पंजे !
-------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे !
गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६
धाकदपटशा
गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६
राजकीय फायदा !
राजकीय फायदा !
---------------------------
“मी सरकारबरोबर आहे पण त्यांनी त्याचा राजकीय फायदा घेऊ नये”. काय असतो हा राजकीय फायदा ?
“पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, भाजपचे नाही” असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यांनी भाजपचा प्रचार करू नये असे काही नसते. मग त्यांना भाजप मध्ये पंतप्रधान म्हणून केलेल्या धोरणांचा फायदा होणारच ! भाजप कडे ज्यास्त लोक निवडून आलेले आहेत म्हणूनच तर त्यांना सत्ता मिळाली ना ? मग सत्ता म्हणजे त्यांनी काय काय करायचे नाही ?
सरकार आणि पक्ष ह्यांचे विभाजन कसे करायचे त्यावरचा एक छान किस्सा आहे. त्यावेळी जनता पक्षाचे नुकतेच सरकार आले होते व त्यांचे एक मंत्री, राजनारायण, औरंगाबादला आले होते. केंद्राच्या मंत्र्याला घ्यायला राज्याचा एक मंत्री दिमतीला असावा लागतो, असा प्रोटोकॉल आहे म्हणे. त्याप्रमाणे कॉंग्रेसचा एक मंत्री लवाजम्यासह त्यांच्या दिमतीला होता. ते औरंगाबादहून पैठणला जायला निघाले. वाटेत रण रण उन्हात रस्त्यावर कोणी चिटपाखरू नाही हे पाहून, ते म्हणाले राज्यमंत्र्याला की आता माझा सरकारी कार्यक्रम इथे संपला व आता मी पक्षाच्या कामाला चाललो आहे, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर येऊ नये. इथे उतरा. मग त्या मंत्र्याला काही मैल चालत गाडीच्या शोधात यावे लागले.
मोदी असे पंतप्रधान केव्हा व भाजपचे पुढारी केव्हा हे कसे ठरवणार ?
आम्हीही असे हल्ले केले होते असे म्हणणारे शरद पवार हे माजी संरक्षण मंत्री म्हणून म्हणत आहेत की राष्ट्रीय कॉंग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून म्हणत आहेत ?
-----------------------------
रविवार, २५ सप्टेंबर, २०१६
मूक मोर्च्याचा मुका
मूक मोर्च्याचा मुका
-----------------------------
मूक म्हणजे मुका असले तरी “मूक मोर्चा” ऐवजी “मुक मोर्चा ” वाचताना काही तरी वेगळे असून चुकले आहे असे का जाणवावे ? “मूक” म्हणताना जर आपण आपला चेहरा आरशात पाहिला तर आपण चुम्बन घेतोय असाच चेहरा होतो असे दिसेल. चुंबनाला बोलीत मुका म्हणतात, पण तो ( “मुका )” ऱ्हस्व उच्चाराचा असला तरी दीर्घ काळ राहावा असेच घेणाऱ्याला वाटत असावे !
आमच्या लायन्स क्लब मध्ये वार्षिक फीस असते दहा बारा हजार रुपये व मेम्बर असतात शंभर, पण मीटिंगला हजर असतात केवळ चाळीस पन्नास. माणसे जमवायची नेहमीच मारामार असते. तशात कोणी दहा लाख, वीस लाख माणसे जमा करीत असतील तर त्यामागे काही तरी प्रचंड कारण असले पाहिजे. त्यात आरक्षण हवे, हे कारण दाट संभवाचे. कारण जाटांचे/पटेलांचे असे मोर्चे आपण पाहिले आहेत. त्यामुळे आत्ता काही पैसे न खर्चता भविष्यात मिळणाऱ्या पैशापोटी एव्हढी माणसे आली असतीलही.
मोर्चा मुका असला, मु र्हस्व असले, तरी तो आरक्षणाचे दीर्घ चुंबन घेणारा असावा !
--------------------
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६
गणेश दिघे
Ganesh Dighe
---------------------------
धाकाने लपले पान
ओठंगले वाकले भाराने
मनोरम रेंगाळून थेंब हसतो
पान पुन्हा पुन्हा लाजते या ओथंबल्या प्रेमाने
-
भिंगुळला तो थेंब दवाचा
आदिसमेच्या समाधिस्त सन्यस्तेने
की ? तिष्टत पाहत वाट कृपण तो खचला
कळाधीन मातीतील मोहमयी मरणाने
-
माती शुष्क मूक मग्न रुदनात
ओटीतील संप्रधार मुग्ध बाळांच्या आक्रोशाने
शुक्रसुर्य खुणवी तेजस आरस्पानी
भय आक्रंदले खोल काळजात तिच्या …. या विषण्ण थराराने .
----------------------
कवीच्या मनात डोकावता येणे हे अवघडच काम. त्याने कितीही नेकीने कवितेत ते दाखविलेले असले तरी. आता उदाहरणार्थ वरील कविता ( गणेश दिघे ह्यांची ) पाहू. काय म्हणतोय कवि ?
पान कशाने लपले आहे ? तर धाकाने. कोणाचा धाक ? तर पानावर रेंगाळणार्या थेंबाचा. ह्या दवबिंदूच्या पानावरच्या प्रेमाने ते पान लाजते आहे. ह्या दवबिंदूला/दवबिंदूतून भिंगासारखे कवीला दिसते आहे. हे भिंगासारखे दिसणे कशाने होते आहे, तर जगाची आदिम अशी जी समाधिस्त सम आहे त्याने. म्हणजे हे कुठल्याशा आदिम प्रेरणेने होते आहे असे कवीला वाटते आहे. त्याच वेळेस कवीला असेही वाटते आहे की रोपे मातीच्या मोहाने मातीत रुजतात, पण कालांतराने मातीच्या कृपणतेने, मरण पावतात, ह्या निरिक्षणाला संन्यस्ततेने हा थेंब पाहतो आहे.
माती अशी मूक रुदनात आहे. तिच्या ओटीत मुग्ध रोपांच्या बाळांचे आक्रोश आहेत. तेजस सूर्य उघडच ही प्रखरता खुणावीत आहे. आणि अशा क्षणी दवबिंदूच्या ह्या निर्मितीच्या कळांविषयी वाटणार्या प्रेमाने ती माती थरारते आहे.
कवीचे पर्यावरण, माती, दवबिंदू, सृजन, मरण हे त्याचे स्वत:चे प्रांत आहेत त्यामुळे असेच का म्हणून आपण त्यात खोड काढू शकत नाही. पण कवीला मातीचे सृजन कमी पडते आहे हे जाणवावे व त्यावर दवबिंदू मातीच्या मदतीस येत आहेत असे वाटावे हे अतिशय संवेदनशीलतेचे आहे. दिवसेंदिवस मातीची सृजनशक्ती वाढतेच आहे हे जरी शास्त्रीय अवलोकन असले तरी कवीमनाला तिचे सृजन कमी पडते आहे असे वाटू शकते, कारण तो वाटण्याचा प्रांत आहे. पर्यावरणाने एकमेका साह्य करू असे वाटत दवबिंदूने मातीच्या साह्यास धावून जावे हे कवीचे वाटणे मात्र अतीव कणवेचे आहे व त्यासाठी ह्या कवितेला दाद द्यावी तेव्हढी कमीच आहे.
--------------------------------
सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६
नीतीच्या बैलाला....कोकिळा !
नीतीच्या बैलाला....कोकिळा !
---------------------------------------
आज एक जर्मनीची बातमी आहे.
कक्कू चाईल्ड लॉ किंवा मिल्क्मेनस् चाईल्ड लॉ नावाचा तिथे कायदा येतोय ज्याच्याने तिथले बाप आपल्या बायकांना विचारू शकणार आहेत की मुलांचा खरा बाप कोण आहे ?
त्याचे असे झाले म्हणे की तिथे स्त्रियांना इतके स्वातंत्र्य आहे की त्यांना नवरे असे विचारू शकत नाहीत व त्यांना मुलांचा सर्व खर्च करावाच लागतो. मागच्या वर्षी एका केस मध्ये म्हणे एका नवऱ्याने मी कशाला मुलांचा खर्च करू असे विचारीत खरा बाप कोण हे तिने सांगावे असा तर्क ठेवला. त्यावरून असा कायदा त्यांनी आणला की मुलांचा खर्च खऱ्या बापाकडून वसूल करायचा तर आयांनी खरा बाप कोण ते सांगितले पाहिजे. न सांगण्याची काही कारणे असतील तर ते कोर्ट ठरवील.
आपल्याला वाटत असेल की हे सगळे साता समुद्राकडे होतेय, आपल्याकडे अजून तशी काही भीती नाही, तर झी मराठी वर खुलता कळी खुलेना नावाची मालिका पहा. लग्नाच्या बोह्ल्यावारच नवरी पोटुशी आहे हे नवऱ्याला कळते इथूनच सुरुवात होतेय.
नीतीच्या बैलाला हो म्हणावे का नीतीच्या कोकीळांना हो ?
---------------------------------
http://www.telegraph.co.uk/news/2016/08/29/germany-to-force-women-to-disclose-if-children-are-from-an-affai/
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
डेट द्या ना गडे
डेट द्या ना गडे
--------------------
काल राहूल गांधी अगदी काकुळतीने विनवीत होते की भाव कधी कमी होतील त्याची डेट द्या!
असे ऐकले आहे की त्या अगोदर ते सोनियाजींशी गळ घालत होते की मला डेट वर जाऊ द्या!
लग्न होईतो बिचाऱ्या ला डेट साठी ठिय्या द्यावा लागतोय!
रविवार, ११ मार्च, २०१२
जंगलात जसे श्वापदांच्या ठशांवरून त्यांचा माग काढतात तसेच समाजात पुढे येणार्या संभाव्य गोष्टी काही काही सिनेमांवरूनही दिसतात. कसे ते पहा :
"कहाणी" दहशतवादाची
"कहानी" ह्या विद्या बालनच्या नवीन चित्रपटामुळे आठवतात त्या जुन्या काळातल्या "कहाण्या" ! सत्यनारायणाच्या पूजेत आपण नेहमी ऐकतो त्या साधू वाण्याच्या कहाणी सारखीच ही कहाणी आहे, फक्त दहशतवादासारख्या नवीन विषयाची. कहाणी ह्या प्रकारात अपार विश्वास असला तरच ती आपण पूर्ण ऐकू शकतो तशीच श्रद्धा ह्या नवीन "कहानी" वर ठेवावी लागते.
ही नवीन "कहानी" आहे दहशतवादाची. कलकत्त्यात मेट्रो मध्ये एक अपघात--स्फोट--होतो व त्यात २०० माणसे मरतात. पण हे करणारा दहशतवादी सापडत नाही. त्याचा शोध घ्यायला एक लंडनहून गरोदर बाई येते व ती कसा ह्या प्रकरणाचा छडा लावते त्याची ही कहाणी आहे. पण ह्या नवीन कहानीत किती तरी धर्माचरणाच्या गोष्टी पहायला मिळतात. त्यातली एक म्हणजे नॅशनल डेटा सेंटर नावाची जी संस्था सरकार चालवीत असते त्यातला एक तडफदार अधिकारी खान नावाचा. आपल्याकडे खरेच दहशतवाद-विरोधी जी पथके आहेत त्यात मुस्लिम अधिकारी अभावानेच असतात. खरे तर "टु कॅच ए थीफ, सेट ए थीफ" ह्या म्हणीप्रमाणे ह्या सिनेमात एका मुस्लिमालाच त्या पथकातला अधिकारी केले आहे, ते फारच कौतुकाचे आहे. पण त्याची श्रद्धा व लगन इतकी प्रभावी दाखविलीय की त्याने गरोदर विद्या बालनच्या पुढ्यात सिगरेट प्यावी, आक्रस्ताळी आक्रमक वागावे ह्याचे आपल्याला काहीच वैषम्य न वाटता उलट त्याचे धारदार वागणे जरा सुखावतेच. कहाण्यात जसा एक उपदेश असतो तसाच हा एक मोलाचा संदेश आहे की दहशतवाद-विरोधी संस्थात अवश्य मुस्लिम असले पाहिजेत.
कहाण्यात अपार श्रद्धा ठेवण्यासाठी घटनांत सारखे काही अगम्य घडावे लागते, तसेच ह्या कहानीत कोण व कशासाठी हे सगळे करत असतो ते एक गूढ ठेवले आहे. भारताने पाकीस्तानला म्हणावे की तुमचे आतंकवादी आमच्याकडे येऊन आतंक करतात व पाकीस्तानने तसेच आपल्याबद्दल म्हणावे हे जसे कायम चालणारे गूढ असते, तसेच ह्या कहानीत सर्व गूढ ठेवले आहे. त्यातला महत्वाचा संदेश म्हणजे आतंकवादी जसे कोण मेले, किती मेले त्याचा विधिनिषेध ठेवत नाहीत तसेच आतंकविरोधी सरकारी खातेही लोकांना वापरत मरवत कारवाई करीत असते हे फार प्रभावीपणे दाखविले आहे. शिवाय शेवटी कशाचाच मागमूस न ठेवल्याने काही पुरावेही मागे राहात नाहीत. ह्याचीच वस्तुस्थितीतली उदाहरणे म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग व असीमानंद ह्यांचे भिजत ठेवलेले घोंगडे लगेच लोकांना आठवेल. तसेच बॉम्ब-स्फोटांचा तपास शेवटपर्यंत न लागणे. आता प्रत्येकानेच विद्या बालन प्रमाणे वैयक्तिक स्तरावर कोडी सोडवणे हे फारच दूरचे होईल. पण सुटकेची दिशा कहानी तिकडेच दाखवते हे कोणाच्या लक्षात येत नाही म्हणून बरे आहे, नाही तर कहानीचे सेंसॉर काही झाले नसते !
-----------------------------------------------------------