सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

म्हणजे म्हंजे ?...वाघाचे पंजे !
आमच्या लहानपणी एक चिडवाचिडवीचा खेळ होता. कोणी "म्हणजे ?", असे विचारले की त्याला अर्थ न सांगता, चिडवायचे, "म्हणजे म्हंजे ?s s....वाघाचे पंजे !". आता "म्हणजे" शब्दाला "म्हंजे" असे लिहिले किंवा उच्चारले तर त्याला वाघाचे "पंजे" हे यमक छान जुळते हे खरे, पण मुळात, "वाघाचे पंजे" हा वाक्प्रचार कसा काय आला असेल ? काय असेल पंजे म्हणजे ?
सगळ्यात चित्तथरारक असतात शिकारीच्या किंवा जंगलातील साहस-कथा. त्यात बर्‍याच गोष्टी स्पष्ट अशा न सांगता काही अटकळी वरनं त्या ताडायच्या असतात. जसे---काल वाघ शिवारात आल्ता काय ? असा प्रश्न असेल तर वाघाच्या पंजांजे ठसे मातीत उमटले असतील तर "हे बघा....पंजे उमटलेत...ह्या दिशेला जातांना..." असे अनुभवी शिकारी दाखवतो. इतकेच नव्हे तर ह्या पंजांच्या ठशावरून वाघ नर का मादी, केवढा मोठा वगैरे अचूक माहीतीही तो देऊ शकतो. म्हणजे क्षुल्लक पंजे ते काय पण ते इतके सगळे बोलून जातात. अमेरिकेत लॉज एंजेलेस ला एका चायनीज थेटराजवळ पदपथावर तर थोर थोर नायक नायिकेच्या पायांचे ठसे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये कायमचे जपून ठेवलेले आठवते का ? आपण जेव्हा म्हणतो की "त्यांनी काळावर आपला ठसा उमटविलेला होता", तेव्हा आपण अशाच कुठल्या ठशांबद्दल बोलत असतो की काय ?
पंजांचे ठसे जसे वाघाच्या हकीकती खुलवून खुणावतात, हे ठसे जसे एक चिन्ह असते एका मोठ्या कथेचे, तसेच आपल्या जीवनात हरघडी घडत असते. फक्त कधी ही चिन्हे अर्थ सांगतात, तर कधी ही चिन्हे आपल्याला चक्रावून टाकत संभ्रमात टाकतात. तरी बरे आजकाल "बॉडी लॅंग्वेज" म्हणजे देहबोलीचे बरेच प्रस्थ माजले आहे. कोणाचा पडलेला चेहरा पाहून आपण त्याला प्रथम चहा वगैरे विचारीत ख्यालीखुशाली आधी विचारतो, जरा दमाने घेतो. तर हे जसे अशा चिन्हांनी समजते तसेच म्हणतात भाषेतही शब्द, अक्षरे, आवाज, ही एक प्रकारची चिन्हेच असतात व आपल्या अगोदरच्या लोकांनी त्याला काही निश्चित अर्थ दिलेले असतात म्हणून नुसता शब्द पाहिला की आपल्याला अर्थ बोध होतो. कधी शब्द गेलेला नसेल तर मात्र आपण अनावधानाने विचारून जातो--"म्हणजे ?" आता तुम्ही चिडवू शकता "म्हणजे म्हंजे ?...वाघाचे पंजे !" किंवा मग सरळ अर्थ सांगू शकता !
जगाच्या उपदव्यापात कधी कधी साध्या साध्या व सोप्या सोप्या चिन्हांचेही अर्थ आपल्या लक्षात येत नाहीत. खरे तर घटना अगदी स्पष्टच असतात. चिन्हे अगदी ठळक असतात. पण एखादी नवखी भाषा वाचावी तसे शब्द व ही चिन्हे आपल्याला अनोळखी होतात. त्याचा अर्थ कळेनासा होतो. जरा डोके चालवले तर ही चिन्हे तुम्हाला "वाघाचे पंजे" अगदी स्पष्ट दाखवतील. मग वाघाला कसे सामोरे जायचे किंवा कुठे पळायचे ते आपण ठरवू शकतो.
तर असेच ठरवलेय की रोजच्या दैनंदिन व्यवहारातल्या चिन्हांचा अर्थ नीट व्यवस्थित समजून सांगायचा म्हणजे तुम्हाला विचारावेच लागणार नाही की "म्हणजे ?" व आम्हालाही म्हणता येईल "हे पहा की, म्हणजे म्हंजे ?...वाघाचे पंजे !"
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी: