रविवार, २६ डिसेंबर, २०१०

वाघाचे पंजे---४
"मराठीत चांगली राजकीय कादंबरी नाही हा उत्तम विश्वास !"
वाद जसे माणसांचे स्वभाव दाखवतात तसेच भाषा व बोलणे त्यामागचे बरेच काही दाखवते. मराठीत चांगले राजकारणच झाले नाही, तर तिथे चांगली राजकीय कादंबरी कशी असणार ? हिमालयाच्या हाकेला सह्याद्री आतापावेतो धावून गेलेला आहे, पण त्याला तख्ताची खुर्ची ( राष्ट्रपतीपद सोडून ) काही कधी नशीब झाली नाही. सदानंद मोरे तर म्हणतात की हे इतिहासापासून होत आले आहे कारण महाराष्ट्राने त्यावेळी गांधींना विरोधच केला. ( त्यांच्या बद्दल नितांत आदर असूनही ! ).चांगले राजकारण म्हणजे चांगल्या राजकारण्यांचे चांगले काम असे जर अभिप्रेत असेल व त्यांचे प्रतिबिंब साहित्यात पडावे असे अध्यक्षांना वाटत असेल तर ते एक उत्तम वाटणे निश्चितच आहे. ह्यामागची नंतर कळून येणारी चाहूल अशी असू शकते की नुकतेच राष्ट्रपतींबरोबर परदेश दौरे करून आलेले अध्यक्ष आता राजकारण्यांवर ( चांगल्या राजकारण्यावर ) कादंबरीच लिहिणार आहेत. जसे पवार साहेबांवर !
आता हे जंगलचे पंजांवरूनचे भाकीत कशावरून तर अध्यक्षांनी फुले, आंबेडकरांच्या बरोबरच अन्नदात्या सकाळलाही नमनाचा सलाम केला त्यावरून. शिवाय आताशी पवार साहेबांवर पुस्तके निघणे अपार महत्वाचे झाले असावे व तसे ते सुरूही झाले आहे. तर असल्या चांगल्या राजकीय कादंबरीची सुपारी खरेतर विश्वासाच्या अंगाने विचार केला तर ती विश्वासरावांना द्यायला हवी होती. पण ते झाडाझडती घेऊन पानीपत करतात असे इतिहास सांगतो ! आणि नेमाडे आपल्याच कोशात राहणारा कोसला !
खेडेगावात कांबळे वापरण्याची पद्धत आहे ती ते घोंगडे कसे पटकन कुठेही अंथरता येते, कोणावरही पांघरून टाकता येते ह्या सोयीसाठी. त्यात ते कायम खांद्यावर बाळगले तर ते भिजत घोंगडे राहात नाही. तर अशा कांबळ्यांचा चांगल्या राजकारण्यांना ज्यास्त भरवसा येणारच. आणि भरवशाची म्हैस टोणगा देत नाही. म्हणून राजकीय कादंबरी द्यावी ती अध्यक्षांनाच. तेच कांबळे उत्तम !
माणसांचे हल्लीचे कर्तृत्व कमी झाले की ती इतिहासाकडे वळतात. शालेय भांडणात सुद्धा आपला जोर कमी वाटायला लागला की नाही का आपण दम भरत, "बघ हं, तुला माहीत नाही की माझे वडील कमिशनर होते !" तर असे आपण इतिहासाकडे वळतो. एखाद्याचे शिक्षण, हुशारी पाहून दुसर्‍याला असूया वाटू लागली की मग तो म्हणायला लागतो की पूर्वी हे शिवाजीचे गुरू नव्हतेच, हटवा त्यांचा पुतळा ! हटवा त्यांचे स्टेडियम !
सदाशिव पेठ विद्वत्तेसाठी जाणवावी तर ती आता चांगल्या मटणासाठी आहे, हे असेच डाव्या हाताने दिलेली, सध्याच्या सदाशिवांची शाबासकी ठरू शकते ! हे उकरून न काढता चला पेटवू सारे रान अशी मराठी हाक कोणी देईल तर ते होईल खरे चांगले राजकारण ! एरव्ही हे ठसे दाखवतात हिंस्त्र श्वापदांचा वावर व गुरगुरणे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा