सीसीटीव्ही--व्हीटीसीसी !
दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यानच्या गदारोळात सीसीटीव्ही कॅमेर्याचे खूपच वादंग झाले. अवघ्या दहा हजार रुपयाच्या ह्या कॅमेर्याचे एवढे काय कौतुक ? असे कॅमेरे मुंबईच्या जव्हेरी बाजारातल्या स्फोटादरम्यानही तर होतेच की, तरीही त्यातून काही सापडले का ? का मग ह्या सीसीटीव्हीचे एवढे महत्व ?
सीसीटीव्ही हा कॅमेरा नसून ही एक वृत्ती आहे. तो एक संदेश आहे. तुम्ही कायम नजरेच्या टप्प्यात आहात असे तुमच्यावर ठासवणारे हे तत्व आहे. ह्याच तत्वानुसार आधुनिक जगात नियंत्रण ठेवणे सुलभ झाले आहे. समजा तुम्ही चोर आहात व एका जवाहिर्याच्या दुकानात चोरी करायला गेला आहात. आणि तिथे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा कोपर्यात लावलेला पाहिला, तर तो नादुरुस्तही असेल असे तुम्ही समजत नाही. तर त्यात आपण न दिसता कशी चोरी करता येईल किंवा त्या कॅमेर्याला निकामी करून कसा कार्यभाग साधता येईल, असाच सराईत चोर विचार करील. म्हणजे एक क्षुल्लक कॅमेरा, जो कदाचित नादुरुस्तही असू शकतो, कित्येक पोलिसांचे काम करून जातो. अमेरिकेतल्या घरांसमोर नुसताच सीसीटीव्ही कॅमेरा नाही तर तो पुरवणार्या सुरक्षा कंपनीची पाटीही लावलेली असते. ती अर्थातच चोरावर धाक दाखवण्यासाठी असते. कित्येक वेळा ते डमी कॅमेरेच निघतात.
पूर्वी एक म्हण असायची की जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्यांच्या काचेच्या घरावर दगडं मारू नयेत. ह्यामागे आपल्याही काचेच्या घरावर इतरांनी दगडं मारली तर होणार्या नुकसानीपेक्षा तुम्ही काचेच्या घरातून दगडं मारताना सहजी दिसाल व पकडल्या जाल ही शक्यताच ज्यास्त महत्वाची आहे. जगातले सगळे नैतिक वागणे ह्याच भीतीपोटी, चांगले दिसण्याच्या निकडीपायी समाजाने विचारात घेतले आहे असे कोणाच्याही ध्यानात येईल. सीसीटीव्ही कॅमेरा चालू असो वा नसो, तो आहे एवढेच वास्तव आतंकवाद्याला अडचण निर्माण करणारे असते. असाच दिसल्या जाण्याचा धाक आपल्याला शाळेत वर्गात गडबड करताना, घरात वडिलांच्या उपस्थितीत, परिक्षेत सुपरवायझर देखरेख करताना, सिग्नल तोडताना आजूबाजूला पोलीस नाही ना ह्या खबरदारीमागे, सामाजिक समारंभात चांगले वागताना ( अगदी वैर्याशीही हस्तांदोलन करताना ), घरात पाहुणे आले असताना अस्ताव्यस्तता दिसू नये ह्या खबरदारीमागे असतो, हे सहजी आपल्या लक्षात येईल.
असाच एक कॅमेरा, जो सीसीटीव्ही च्या अगदी विरुद्ध आहे ( म्हणून समजा आपण त्याला व्हीटीसीसी म्हणूयात ! ) असा असतो व तो नियंत्रण करणारा वापरत असतो किंवा निदान तशी त्याची इच्छा असते. उदाहरण घ्या, सोनिया गांधींचे. सगळ्या जगाला माहीत आहे की खरी सत्ता ह्या बाईकडेच आहे. पण ती कायम लोकांच्या नजरेपासून दूर राहते. मी नाही, मनमोहन सिंग हे पंतप्रधान असल्याने, सर्वेसर्वा आहेत, असे ती चाणाक्षपणे आपल्याला भासवते. म्हणजे तिच्या ह्या व्हीटीसीसी कॅमेर्याने तिचे नियंत्रण आपल्याला दिसणार नाही अशी तिची इच्छा असते. ह्याच पडदा टाकण्याच्या वृत्तीपायी मग त्या आपले दुखणेही जनतेपासून लपवून ठेवतात. आणि हे लपवून ठेवणे किती कीव येण्याजोगे आहे ते पहा. आपण जर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलात उपचाराला गेलो तर लोकांना नक्कीच कळते की आपल्याला काय झाले आहे, किंवा टाटा मेमोरियल मध्ये गेलात तर कॅंसर झालाय, हे सांगावेच लागत नाही. तसेच त्यांना न्यूयॉर्कच्या स्लोन-केटरिंग मेडिकल हॉस्पिटलात शस्त्रक्रियेला नेले म्हणजे काय झालेय हे ज्यांना स्लोन केटरिंग हे कॅंसरचे सर्वात प्रगत हॉस्पिटल आहे हे माहीत आहे त्यांना लगेच कळते. मग कितीही व्हीटीसीसी कॅमेरे लावून धूसरता पसरवली तरी जे कळायचे ते लोकांना कळतेच. पण ह्यातून सत्ता गाजवणार्यांना स्वत: पडद्याआड राहणे किती निकडीचे असते त्याची चुणूक पहायला मिळते.
अण्णा हजारेंना अटक करण्याचे हुकूम कोणी दिले हे जनतेला तेव्हाच कळते, जेव्हा होम मिनिस्टर म्हणतात की मला माहीत नाही, हे काम पोलीस कमिश्नरांचे आहे, त्यांना माहीत असेल. ह्या म्हणण्यामागे मलाही असा व्हीटीसीसी कॅमेरा, पडदा ठेवणारा कॅमेरा, हवाय असेच ते जणु मागत असतात. राज-सत्ता उपभोगणार्याला पडद्याची गरज अशी प्रचंड असते व ते ती अशी वेळोवेळी न दाखवणारे व्हीटीसीसी कॅमेरे उभारून दाखवत असतात.
सीसीटीव्ही कॅमेरा काय घडतेय ते टिपत असतो तर व्हीटीसीसी ऍंटी-कॅमेरा काय दिसतेय त्यावर पांघरूण घालीत असतो !
--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
आपल्या देशाचे दुर्दैव आहे,की या देशातील फितुरी ही दुर्गुण आपल्याला शिवाजी महाराजांच्या कालापासून सतत दगा देत आला आहे. आज तेच घडत आहे. आपल्या देशातील मुस्लीम लोकांना हा आपला देश आहे, हेच वाटत नाही. त्यांना पाकिस्तानात जाऊन आपल्याला मुजाहीर म्हणवून घेण्यात धन्यता वाटते. हे जोवर संपत नाही, तोपर्यंत आपल्याला हा दहशतवाद छळत राहाणार. कित्येकांचे बळी घेणार. कठोर आणि प्रामाणिक नेतृत्व आणि देशप्रेमी नागरिक ही आपल्या देशाची नितांत गरज आहे.
उत्तर द्याहटवामंगेश नाबर.