-------------------------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे : १६:
क्रिएटिनिनची क्रियेटिव्हिटी !
रक्ताच्या तपासणीत क्रियेटिनिन नावाचे घटक तपासतात व ते साधारणपणे ०.९ इतके असावे लागते तर तब्येत आलबेल आहे असे समजतात. बहुतेक सीरीयस पेशंटना हॉस्पिटल मध्ये असताना ह्या क्रियेटिनिनच्या भोज्याला कधी ना कधी शिवावेच लागते, इतके हे प्रकरण सर्वव्यापी आहे. हॉस्पिटल मध्ये १५/२० दिवस काढल्यावर माझे एकदा क्रियेटिनिन ३.२ वर पोचले होते. झाले, डॉक्टरांनी नेहमीच्या धोक्याच्या घंटया वाजवल्या. नेफ्रॉलॉजिस्ट ( किडनी स्पेशॅलिस्ट ) कडे जावे लागले. त्याने परत निरनिराळ्या सॉल्टस्चे संतुलन बघण्याच्या तपासण्या केल्या, औषधे दिली आणि खाजगीत सांगितले की घाबरू नका, फक्त भरपूर पाणी प्या ! पाच दिवसांनी परत क्रियेटिनिन तपासले. ते काही हटत नव्हते. मग डॉक्टर म्हणायला लागला ह्यावर एक इंपोर्टेड औषध आहे, जे सलाईनमधून द्यावे लागेल व ते जरा महागडे आहे, ४ हजार रुपयाची एक बाटली व अशा चारपाच तरी घ्याव्या लागतील. ह्याच डॉक्टरचे खाली औषधांचे दुकान होते. दुकानदार स्वत: म्हणाला की कमाल आहे, क्रियेटिनिन काही औषधाने लगेच खाली येणारे प्रकरण नाहीय. त्याला महिना दोन महिने लागतातच. मग ह्यावर खात्री करण्यासाठी ज्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये क्रियेटिनिन तपासतात त्या टेक्निशियनलाच विचारले की बाबा हे किती सीरीयस आहे? मरणार तर नाही ना ? त्याने सांगितले की साहेब तुम्ही एकच किडनी असलेले लोक पाहिले आहेत का ? त्यांचे क्रियेटिनिन एक किडनी निकामी झालेली असल्याने ( ती नसल्यानेच ) ८ पर्यंत जाते. काही होत नाही. एका सरकारी इस्पितळातल्या स्पेशॅलिस्टाला विचारले तर तो म्हणाला, आम्ही तर क्रियेटिनिन तपासतच नाही. काय उपयोग ? ज्यास्त असले तरी काय उपयोग, काही औषधे आहेत का ? त्यापेक्षा पायावर सूज आहे का तेवढे पहावे व होईल कमी म्हणून धकवावे.
मग डॉक्टर लोक हमखास नेहमी क्रियेटिनिनचे प्रकरण का उकरून काढतात ? कारण हॉटेल सारखेच त्यांच्या प्रॅक्टीस मध्ये किती खाटा गेलेल्या आहेत त्यावर नफा अवलंबून असतो. मुळात डॉक्टरची प्रक्टीसच लोक आजारी पडण्यावर अवलंबून असते. मग त्यांना हे क्रियेटिनिन प्रकरण चांगले मदत करते. पेशंटला घाबरवता व धरून ठेवता तर येते, पाहिजे तितका वेळ, शिवाय पेशंट मरण्याचा धोकाही नसतो. कोणाही महिना दोन महिने इस्पितळात काढलेल्या पेशंटला विचारा, त्याला हे क्रियेटिनिन प्रकरण पाठ असते !
हे क्रियेटिनिन प्रकरण अमरसिंगांच्या डॉक्टरांनी काढले नसते तर नवलच ! त्यांचे क्रियेटिनिन वाढले म्हणे ! किती ? तर ०.९ चे झाले १.३ ! आणि त्यासाठी हॉस्पिटलात दाखल करणे अत्यावश्यक असे ठरले ! ते घरी असताना त्यांचे क्रियेटिनिन वाढले असते तर काय केले असते ? तर काही नाही, जरा पाणी ज्यास्त प्यायचे झाले ! मग हा सगळा तमाशा कशा करिता ? तर तिहार जेल नको, हॉस्पिटल परवडले म्हणून. तशात सायकियॅट्रिस्टिक मदत कशासाठी हवी तर ऍंक्झाइटीसाठी. काय असते ही मदत ? औषधे असतील तर ती तिहार जेलमध्येही घेता येतील की, आणि समुपदेशनाने जात असेल तर मग ऍंक्झायटी ती काय ?
जंगलातले वाघाचे ठसे जर तो पाण्यापाशी दबा धरून बसला आहे असे दाखवत असतील तर आपण काय समजतो ? की पाण्यासाठी आलेल्या प्राण्यांची शिकार करण्याचा त्याचा मनसुबा असावा ! तसाच अमर सिंगाचा काय मनसुबा असावा, हे कळायला तर ठसेही पाह्यची गरज लागू नये ! शिवाय त्यांचे वकील कोण तर, राम जेठमलानी ! हरे राम !
---------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा