बुधवार, २० जुलै, २०११

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे-----१२
कटरीनाचा इंडियन कैफ
शितावरून भाताची परीक्षा किंवा जंगलात नुसत्या वाघाच्या पंजांच्या ठशावरून वाघाचा ठावठिकाणा शोधण्या सारखाच प्रकार आहे, लोकांच्या बेसावध बोलण्यावरून काही मूलभूत समजूती समजून घेण्याचा.
काय म्हणाली कटरिना ? तिचे वडील एशीयन होते, आई ब्रिटिश होती, आणि ती सध्या इंडियन सिनेमाची अनभिक्षित राणी आहे, म्हणून काय झाले, मी काही एकटीच अशी अर्धी इंडियन नाहीय, राहूल गांधीही असेच अर्धे इंडियन आहेत की ?
आता ह्यावरून राष्ट्रीयतेच्या कल्पना कशा रुजतात, कशा बदलतात हे पाहणे मोठे मजेशीर आहे. आजकाल भारतात प्रत्येक घरटी एक तरी जण अमेरिकेत असतो. आणि तो खूप वर्षांपासून तिथे असेल तर तो अमेरिकनच असतो. पण ते जेव्हा इथे येतात, किंवा तिथे असतानाही, त्यांना आपण व तिथले लोक भारतीयच समजतो. भले त्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व असो, अमेरिकन पासपोर्ट असो. सुरुवातीला त्यांना ते अमेरिकन आहेत, असेच दाखवायचे असते. पण त्यांचे चेहरे, रंग-रूप हे असते भारतीय. तेव्हा त्यांना तिथले लोक भारतीयच समजतात, तसेच वागवतात. हळू हळू त्यांना तो समज पत्करावा लागतो. माझी नातवंडे अमेरिकन नागरिक आहेत. ती नुकतीच सुटीत भारतात आली होती. सुटीच्या रिवाजाप्रमाणे आमचे खूप सिनेमे पाहणे झाले. सिनेमे होते अमेरिकनच. जसे कुंफू पांडा-२, पायरेटस्‌ ऑफ कॅरीबीयन, हॅरी पॉटर वगैरे. आजकाल मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमाच्या अगोदर राष्ट्रगीत होते. आणि एक राष्ट्रगीत तर मुक्या-बहिर्‍यांच्या भाषेतले एव्हढे अप्रतीम आहे की ते सगळ्यांच्याच मनाला शिवते. पाच सहा सिनेमात माझी नातवंडे जन-गण-मन सहज गुणगुणू लागली. ते त्यांना पाठ झाले व आवडलेही. मी त्यांना अमेरिकन ऍंथेम विषयी विचारले तर कां कू करीत सांगू लागली की आम्हाला ते येत नाही, कारण आमच्याकडे ते क्वचितच वाजवतात, म्हणतात. आता राष्ट्रगीत येण्यावरून काही नागरिकत्व ठरत नाही हे खरे, पण ह्या अमेरिकन नातवंडांना, एका सुटीत, हेच आपले राष्ट्रगीत वाटू लागले आहे. मग हे भारतीयच झाले की !
असेच "अर्धे इंडियन" ह्या समजूतीचे आहे. बाप किंवा आई ह्यापैकी एकच इंडियन असेल तर त्यांची मुले आपण म्हणतो अर्धी इंडियन आहेत. आता जीवशास्त्राप्रमाणे हे बरोबर का चूक माहीत नाही, पण साधारणपणे आपण असेच समजतो. कांटेकोरपणे पाहिले तर इंदिरा गांधींचे यजमान फिरोज गांधी हे मुसलमान होते, त्यांचे लग्नही इंग्लंडला त्याच पद्धतीने झाले होते. पण महात्मा गांधींच्या मध्यस्तीमुळे ते परत हिंदू पद्धतीने भारतात झाले. ह्या समजूतीने राजीव गांधी अर्धे मुसलमान, अर्धे हिंदू होतील. त्यामुळेच सोनियांच्या आईवडिलांचा सुरुवातीला विरोध झाला असावा. आता त्यांचा मुलगा राहूल, आई ख्रिश्चन व बाप अर्धा मुसलमान, ह्या हिशेबाने ठरेल पाव मुसलमान व अर्धा ख्रिश्चन !. ( म्हणूनच कदाचित तो उरलेली मुसलमानी पावली, शोधीत असावा ! ).
सौंदर्य जसे चित्रात नसून ते चित्र पाहणार्‍याच्या डोळ्यात असते, तसेच भारतीयत्व किंवा हिंदुत्व हे पाहणार्‍यांच्या समजूतीत असायला हवे ! चित्रा वरून एम.एफ.हुसेन ह्यांची आठवण निघायलाच हवी . कतार सरकार काही सवलती देते म्हणून ते भले कतारी झाले असतील, पण इतिहास व जनता त्यांना भारतीय चित्रकारच मानणार . हिंदूंच्या विरोधामुळे ते भारत सोडून गेलेले असले तरी लोक त्यांना भारतीयच समजणार. मग कागदोपत्री काही का असेना !
हेच तर आहे, म्हंजे, म्हंजे, वाघाचे पंजे !

-----------------------------------------------------------------------------------------------