जंगलात जसे श्वापदांच्या ठशांवरून त्यांचा माग काढतात तसेच समाजात पुढे येणार्या संभाव्य गोष्टी काही काही सिनेमांवरूनही दिसतात. कसे ते पहा :
"कहाणी" दहशतवादाची
"कहानी" ह्या विद्या बालनच्या नवीन चित्रपटामुळे आठवतात त्या जुन्या काळातल्या "कहाण्या" ! सत्यनारायणाच्या पूजेत आपण नेहमी ऐकतो त्या साधू वाण्याच्या कहाणी सारखीच ही कहाणी आहे, फक्त दहशतवादासारख्या नवीन विषयाची. कहाणी ह्या प्रकारात अपार विश्वास असला तरच ती आपण पूर्ण ऐकू शकतो तशीच श्रद्धा ह्या नवीन "कहानी" वर ठेवावी लागते.
ही नवीन "कहानी" आहे दहशतवादाची. कलकत्त्यात मेट्रो मध्ये एक अपघात--स्फोट--होतो व त्यात २०० माणसे मरतात. पण हे करणारा दहशतवादी सापडत नाही. त्याचा शोध घ्यायला एक लंडनहून गरोदर बाई येते व ती कसा ह्या प्रकरणाचा छडा लावते त्याची ही कहाणी आहे. पण ह्या नवीन कहानीत किती तरी धर्माचरणाच्या गोष्टी पहायला मिळतात. त्यातली एक म्हणजे नॅशनल डेटा सेंटर नावाची जी संस्था सरकार चालवीत असते त्यातला एक तडफदार अधिकारी खान नावाचा. आपल्याकडे खरेच दहशतवाद-विरोधी जी पथके आहेत त्यात मुस्लिम अधिकारी अभावानेच असतात. खरे तर "टु कॅच ए थीफ, सेट ए थीफ" ह्या म्हणीप्रमाणे ह्या सिनेमात एका मुस्लिमालाच त्या पथकातला अधिकारी केले आहे, ते फारच कौतुकाचे आहे. पण त्याची श्रद्धा व लगन इतकी प्रभावी दाखविलीय की त्याने गरोदर विद्या बालनच्या पुढ्यात सिगरेट प्यावी, आक्रस्ताळी आक्रमक वागावे ह्याचे आपल्याला काहीच वैषम्य न वाटता उलट त्याचे धारदार वागणे जरा सुखावतेच. कहाण्यात जसा एक उपदेश असतो तसाच हा एक मोलाचा संदेश आहे की दहशतवाद-विरोधी संस्थात अवश्य मुस्लिम असले पाहिजेत.
कहाण्यात अपार श्रद्धा ठेवण्यासाठी घटनांत सारखे काही अगम्य घडावे लागते, तसेच ह्या कहानीत कोण व कशासाठी हे सगळे करत असतो ते एक गूढ ठेवले आहे. भारताने पाकीस्तानला म्हणावे की तुमचे आतंकवादी आमच्याकडे येऊन आतंक करतात व पाकीस्तानने तसेच आपल्याबद्दल म्हणावे हे जसे कायम चालणारे गूढ असते, तसेच ह्या कहानीत सर्व गूढ ठेवले आहे. त्यातला महत्वाचा संदेश म्हणजे आतंकवादी जसे कोण मेले, किती मेले त्याचा विधिनिषेध ठेवत नाहीत तसेच आतंकविरोधी सरकारी खातेही लोकांना वापरत मरवत कारवाई करीत असते हे फार प्रभावीपणे दाखविले आहे. शिवाय शेवटी कशाचाच मागमूस न ठेवल्याने काही पुरावेही मागे राहात नाहीत. ह्याचीच वस्तुस्थितीतली उदाहरणे म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग व असीमानंद ह्यांचे भिजत ठेवलेले घोंगडे लगेच लोकांना आठवेल. तसेच बॉम्ब-स्फोटांचा तपास शेवटपर्यंत न लागणे. आता प्रत्येकानेच विद्या बालन प्रमाणे वैयक्तिक स्तरावर कोडी सोडवणे हे फारच दूरचे होईल. पण सुटकेची दिशा कहानी तिकडेच दाखवते हे कोणाच्या लक्षात येत नाही म्हणून बरे आहे, नाही तर कहानीचे सेंसॉर काही झाले नसते !
-----------------------------------------------------------