मंगळवार, १९ एप्रिल, २०११

वाघाचे पंजे---१०
चोराच्या वाटा....
आपण आपल्या दुसरीतल्या मुलीला "मार्क कमी का मिळाले ?" म्हणून दटावले की हमखास उत्तर मिळते की "बाबा, जया तर नापासच झालीय." आता जयाच्या नापास होण्याने हिचे कमी असलेले मार्क का ज्यास्त होतात ? पण हे असेच चालते व आपण ह्याला कायम फशी पडतो. भ्रष्टाचाराचेही असेच आहे. शरद पवारांच्या मानाने, कपिल सिबल हे तर धुतल्या तांदळासारखेच आहेत. हे आपल्याला लगेच पटते. अण्णांनाही ते पटते. शांती भूषण हे स्वत: एकेकाळी कायदेमंत्री होते. त्या काळात त्यांनी लोकपाल-बिल का नाही आणले ? असे कोणी म्हटले की त्यांची १३६ कोटीची मिळकत आपल्याला संशयास्पद वाटायला लागते. मग त्यांच्या सिड्या बाहेर आल्या की भले भले म्हणू लागतात की जर पवारांना आपण नको म्हटले तर ह्यांनाही नकोच म्हणावे.
ह्या असल्या विचारात आपली गल्लत कुठे होते ? नीट कप्प्याकप्प्याने विचार न केल्याने. ही कमीटी कशाची आहे ? तर लोकपाल-बिलाचा मसुदा करायची. त्यात कोण हवे ? तर ज्यांना मसुदा करण्याची माहीती आहे, कायदा कसा व्यवस्थित करावा, त्यात पळवाटा कशा ठेऊ नयेत ही माहीती असणारे. अण्णांना तर ही काहीच माहीती नाही. मग ते कशाला हवेत ? तर राजकारणी लोक सोयीस्करपणे एकतर कायदा/ बिल आणण्याचे टाळतील व आणला तरी लुळा-पांगळा असा ठेवतील अशी भीती वाटते, व त्यांच्यावर वचक हवा म्हणून. आता असे बिल तयार करण्यासाठी भ्रष्टाचारी राजकारणी कसा कसा भ्रष्टाचार करतात हे माहीत असणारे लोक असावेत की ज्यांना भ्रष्टाचार म्हणजे कसे लिहायचे बुवा, असे सांब-सदाशिव नैतिक चारित्र्याचे लोक असावेत ?
पूर्वी म्हणायचेच ना, की चोराला पकडायचे असेल तर चोरालाच सांगा, कारण चोराच्या वाटा चोरांनाच माहीत असतात. ( टु कॅच ए थीफ, सेट ए थीफ ! ). पोलीस स्वत: शुद्ध चारित्र्याचा असून काय उपयोग, त्याला चोराला पकडता आले पाहिजे. आणि हे काही आजकालचे विचार नाहीत. थेट तुकाराम महाराजांपासून चालत आलेले आहेत. ते म्हणाले होते : अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईंविण नाहीं ॥.
असे जर आहे तर मग कायदा/बिलाचा मसुदा करण्यासाठी फक्त योग्यता व दृष्टिकोण पहावा. जर वकीलाने १३६ कोटीची माया चोरांना पकडून केलेली असेल, वा चोरांना पळून जायला मदत करून मिळविलेली असेल तरीही त्याला पळवाटा चांगल्याच माहीत आहेत असेच सिद्ध होते, व तो योग्यच ठरतो. चोर पकडायला चोर नेमावा ह्या न्यायाने खरे तर अमरसिंहानाच ह्या कमीटीवर नेमले तर चांगले. उगाच चारित्र्याचा निष्कलंक असण्याचा बाऊ करण्यात काय अर्थ ?
जंगलात वाघाला पकडायचे असेल तर तो पाणी प्यायला केव्हा येतो, हे त्याच्या पंजांच्या ठशांच्या खाणाखुणावरून शिकारी लोक ठरवतात. ते वाघाला पाणी पिताना त्याची शिकार कशी करायची असा अहिंसेचा विचार करीत नाहीत. एवढेच कशाला काही मचाणावरचे शिकारी तर खाली बकरीला वाघाच्या तोंडी देण्याची व्यवस्था करूनच सरसावून बसतात. वाघांच्या पंज्यांवरून सावज हेरायचे असेल तर अण्णांनीही अशी एखादी बकरी बांधून बघायला हरकत नाही. शिकार साधल्याशी मतलब, शेळी वातड आहे का मऊ ते वाघ बघेल....!

----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

1 टिप्पणी: