सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे--१७
कोण आत्ता कुठे---कसा ?
जंगलात तर्क लढवायला श्वापदे प्रत्यक्ष समोर नसतात. तेव्हा त्यांच्या ठशांवरून, त्यांच्या झाडांना शिंगे घासण्यावरून, व त्यांच्या हगण्यावरून, शेणावरून अनुमान काढण्याची पद्धत आहे. राजकारण हे सुद्धा एक निबिड अरण्यच असल्यासारखे असते. येथे जे दिसते त्यामागे श्वापदांचे अनेक व्यवहार छुपलेले असतात. त्यांच्या मागावर त्यांनी करून ठेवलेली घाण दुर्गंधी आणतेच. आता ह्या एका बातमीतच पहा, काय काय लपलेले दिसते ते:
"मल्लिका साराभाई ह्यांनी २००२ मध्ये सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. २००२ साली गुजरातेत जी जातीय दंगल उसळली त्यासंबंधी. आत्ता काल त्यांनी एक आरोप केला की मोदींच्या लोकांनी माझ्या वकीलांना त्यावेळी १० लाख रुपये लाच देऊ केली होती. त्यांचे सध्याचे वकील महेश अगरवाला ह्यांनी ह्या आरोपाचे खंडन केले. ते म्हणाले की मी त्यावेळी (२००२) साराभाईंचा वकील नव्हतो व मला काही कोणी लाच दिलेली नाही.
कोण होते मल्लिका साराभाईंचे त्याकाळचे वकील ? तर ते होते पी. चिदंबरम. बरोबर आज जे गृहमंत्री आहेत व जे पूर्वी अर्थमंत्री होते तेच ते चिदंबरम. ( म्हणजे ही याचिका एकप्रकारे कॉंग्रेसनेच केलेली होती हे किती स्पष्ट आहे ! ).
त्यावेळी ह्या याचिकेची सुनावणी करणारे न्यायाधीश कोण होते ? तर ते होते श्री.शिवराज पाटील. बरोब्बर ! हेच ते सध्याच्या वादात अडकलेले कर्नाटकाचे लोकायुक्त असलेले ( व आरोपांनी विद्ध होऊन आजच राजीनामा देणारे ) शिवराज पाटील. ह्यांनीच अवघ्या सहा महिन्यापूर्वी कपिल सिबल ह्यांच्या अखत्यारीत २-जी प्रकरणात एक-सदस्य-चौकशी मंडळ बनून एक अहवाल दिला होता ज्याप्रमाणे मग कपिल सिबल पूर्वीच्या भाजपच्या मंत्र्यांनाही ह्या प्रकरणात गोवूं शकले.
ह्याच शिवराज पाटीलांबरोबर मल्लिका साराभाईंची याचिका ऐकणार्‍या दुसर्‍या न्यायाधीश त्याकाळी होत्या जस्टिस सीमा. कोण ह्या ? अहो, सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारच्या मानव-अधिकार मंडळाच्या अध्यक्षा आहेत.
गुजरात सरकारची बाजू लढवणारे त्यावेळी वकील होते एक तुषार मेहता नावाचे वकील. कोण हो हे ? तर तेच हे सध्याच्या गुजरात सरकारचे ऍडिशनल ऍडव्होकेट जनरल."
ह्या बातमीतून कोणी कोणाला लाच दिली हे जरी समजत नसले तरी कोणाला कशामुळे काय काय मिळाले ते मात्र हमखास दिसते. जसे अशा याचिका लढविल्याबद्दल कॉंग्रेस तर्फे पी.चिदंबरम ह्यांना अर्थमंत्रीपद व गृहमंत्रीपद, तर न्यायाधीशांना निवृत्तीनंतर मानाची व लठ्ठ पगाराची पदे ! आहे ना जंगलातले ठसे पाहूनचे अचूक अंदाज !....म्हणजे, म्हणजे.....वाघाचे पंजे !

-----------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा