बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

गणेश दिघे

Ganesh Dighe
---------------------------
धाकाने लपले पान
ओठंगले वाकले भाराने
मनोरम रेंगाळून थेंब हसतो
पान पुन्हा पुन्हा लाजते या ओथंबल्या प्रेमाने
-
भिंगुळला तो थेंब दवाचा
आदिसमेच्या समाधिस्त सन्यस्तेने
की ? तिष्टत पाहत वाट कृपण तो खचला
कळाधीन मातीतील मोहमयी मरणाने
-
माती शुष्क मूक मग्न रुदनात
ओटीतील संप्रधार मुग्ध बाळांच्या आक्रोशाने
शुक्रसुर्य खुणवी तेजस आरस्पानी
भय आक्रंदले खोल काळजात तिच्या …. या विषण्ण थराराने .
----------------------
कवीच्या मनात डोकावता येणे हे अवघडच काम. त्याने कितीही नेकीने कवितेत ते दाखविलेले असले तरी. आता उदाहरणार्थ वरील कविता ( गणेश दिघे ह्यांची ) पाहू. काय म्हणतोय कवि ?
पान कशाने लपले आहे ? तर धाकाने. कोणाचा धाक ? तर पानावर रेंगाळणार्‍या थेंबाचा. ह्या दवबिंदूच्या पानावरच्या प्रेमाने ते पान लाजते आहे. ह्या दवबिंदूला/दवबिंदूतून भिंगासारखे कवीला दिसते आहे. हे भिंगासारखे दिसणे कशाने होते आहे, तर जगाची आदिम अशी जी समाधिस्त सम आहे त्याने. म्हणजे हे कुठल्याशा आदिम प्रेरणेने होते आहे असे कवीला वाटते आहे. त्याच वेळेस कवीला असेही वाटते आहे की रोपे मातीच्या मोहाने मातीत रुजतात, पण कालांतराने मातीच्या कृपणतेने, मरण पावतात, ह्या निरिक्षणाला संन्यस्ततेने हा थेंब पाहतो आहे.
माती अशी मूक रुदनात आहे. तिच्या ओटीत मुग्ध रोपांच्या बाळांचे आक्रोश आहेत. तेजस सूर्य उघडच ही प्रखरता खुणावीत आहे. आणि अशा क्षणी दवबिंदूच्या ह्या निर्मितीच्या कळांविषयी वाटणार्‍या प्रेमाने ती माती थरारते आहे.
कवीचे पर्यावरण, माती, दवबिंदू, सृजन, मरण हे त्याचे स्वत:चे प्रांत आहेत त्यामुळे असेच का म्हणून आपण त्यात खोड काढू शकत नाही. पण कवीला मातीचे सृजन कमी पडते आहे हे जाणवावे व त्यावर दवबिंदू मातीच्या मदतीस येत आहेत असे वाटावे हे अतिशय संवेदनशीलतेचे आहे. दिवसेंदिवस मातीची सृजनशक्ती वाढतेच आहे हे जरी शास्त्रीय अवलोकन असले तरी कवीमनाला तिचे सृजन कमी पडते आहे असे वाटू शकते, कारण तो वाटण्याचा प्रांत आहे. पर्यावरणाने एकमेका साह्य करू असे वाटत दवबिंदूने मातीच्या साह्यास धावून जावे हे कवीचे वाटणे मात्र अतीव कणवेचे आहे व त्यासाठी ह्या कवितेला दाद द्यावी तेव्हढी कमीच आहे.
--------------------------------

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

नीतीच्या बैलाला....कोकिळा !

नीतीच्या बैलाला....कोकिळा !

---------------------------------------

आज एक जर्मनीची बातमी आहे.

कक्कू चाईल्ड लॉ किंवा मिल्क्मेनस् चाईल्ड लॉ नावाचा तिथे कायदा येतोय ज्याच्याने तिथले बाप आपल्या बायकांना विचारू शकणार आहेत की मुलांचा खरा बाप कोण आहे ?

त्याचे असे झाले म्हणे की तिथे स्त्रियांना इतके स्वातंत्र्य आहे की त्यांना नवरे असे विचारू शकत नाहीत व त्यांना मुलांचा सर्व खर्च करावाच लागतो. मागच्या वर्षी एका केस मध्ये म्हणे एका नवऱ्याने मी कशाला मुलांचा खर्च करू असे विचारीत खरा बाप कोण हे तिने सांगावे असा तर्क ठेवला. त्यावरून असा कायदा त्यांनी आणला की मुलांचा खर्च खऱ्या बापाकडून वसूल करायचा तर आयांनी खरा बाप कोण ते सांगितले पाहिजे. न सांगण्याची काही कारणे असतील तर ते कोर्ट ठरवील.

आपल्याला वाटत असेल की हे सगळे साता समुद्राकडे होतेय, आपल्याकडे अजून तशी काही भीती नाही, तर झी मराठी वर खुलता कळी खुलेना नावाची मालिका पहा. लग्नाच्या बोह्ल्यावारच नवरी पोटुशी आहे हे नवऱ्याला कळते इथूनच सुरुवात होतेय.

नीतीच्या बैलाला हो म्हणावे का नीतीच्या कोकीळांना हो ?

--------------------------------- 

http://www.telegraph.co.uk/news/2016/08/29/germany-to-force-women-to-disclose-if-children-are-from-an-affai/