शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

वाघाचे पंजे-----७
शिवानंदांचे शिव शिव !
शिवानंदन ह्यांची ख्याती चांगलीच आहे. त्यामुळे ते परवा बोलले ते का व कशासाठी हा प्रश्न पडतोय का ? तर जंगलात आपण जसे आधी वाघाच्या पंजांचे ठसे तपासतो व मग कोणता वाघ कुठे असेल ते सांगतो, तसे काही "ठसे" पाहू.
सोनवणे ह्या अधिकार्‍याला तेल-माफियावाल्यांनी का जाळून मारले ते एव्हाना आपल्याला कळलेच आहे. तेल-माफिया अस्तित्वात आहे व चांगला रगड धडधाकट आहे, हे तर आपल्याला पटलेलेच असते. तशात सोनवणे हे काही फार धुतल्या तांदुळाच्या प्रतिमेचे होते ( अशी काही प्रतिमा असते ह्यावरच सध्या संशय वाटतो आहे ! ) अशातले नाही. तेव्हा ते वसूलीसाठी गेले असावेत हेही संभवनीय आहे. त्यातून हे जळित प्रकरण झाले असावे. असे आपल्याला वाटते ना वाटते तोच शिवानंदन ह्यांनी दुसरेच अस्त्र परजले आहे. ते म्हणतात मुळात ह्या तेल-वाळू-माफियांविरुद्ध तुम्ही कारवाई करू नका असा सरकारनेच पोलिसांना आदेश काढलेला आहे. म्हणजे हे कुरण कलेक्टर व महसूल अधिकार्‍यासाठी राखीव आहे, असाच त्याचा सरळ अर्थ निघतो. मग पोलीसांनी धाडी टाकल्या, काही लोकांना पकडले अशा बातम्या प्रसृत झाल्या त्या कशा ? तर शिवानंदन म्हणतात, अहो तो सगळा बनाव होता ! तुम्हा आम्हाला बनवण्यासाठी !
आता राजकारणी असे बनेल आहेत, हे तर आपल्याला माहीतच आहे. ते तर आपल्याला लगेच पटतेही. पण हे शिवानंदन साहेब, इतके बेधडक कसे बोलताहेत ? त्यांना भीती कशी नाही वाटत ?
तर ही बातमी बघा : आता २८ फेब्रुवारीला शिवानंदन साहेब निवृत्त होत आहेत !
चला निवृत्त होताना का होईना वाघाला तो वाघ होता हे कळले हेही नसे थोडके !

-----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा