मंगळवार, २२ मार्च, २०११

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


वाघाचे पंजे---८
हसन-अली ह्या पुण्याच्या घोडेव्यापार्‍याला दोन वर्षांपूर्वी अटक करून त्याची जबानी चित्रित करणार्‍या एका पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. ज्या हसन अलीने ७०हजार कोटीचा नुसता कर बुडवला आहे व स्विस बॅंकेत ८ बिलियन डॉलर जमा केले आहेत, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय कारवाई करीत आहे. ह्या हसन अलीला दोन वर्षापूर्वी अटक करून त्याची जबानी चित्रित करणार्‍या महाराष्ट्राच्या एका पोलीस अधिकार्‍याला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. त्याचे नाव आहे देशभ्रतार.
भ्रतार म्हणजे नवरा. देशभ्रतार म्हणजे देशच ज्यांचा नवरा आहे तो . म्हणजे देशाची बायकोच. तर बायको कशी बायको सारखी हवी. तिने खालच्या मानेने घरकाम, चूल-मूल पहावे. नेमलेला बंदोबस्त, मंत्र्यांच्या ताफ्याला सुरक्षा, येता जाता मुजरा, सांगितलेल्या पकड, चौकशी कर, असे नेहमीची कामे पहावीत . बाहेरच्या भानगडीत तिने कशाला पडावे. हसन-अली ह्याला केंद्र सरकारचे ई-डी खाते ७०हजार कोटीचा कर बुडवला म्हणून कारवाई करीत आहे. हिने त्यात कशाला पडावे ? बरे पडलेच तर राजरोस मुलाखतीची सीडी काढून त्याचा पुरावा कशाला ठेवावा ? बाई माणसाने स्वत:ची अक्कल कशाला चालवावी ? कोणत्या तीन मुख्यमंत्र्यांचे पैसे तो हवाला मार्गे गुंतवीत होता, हे काय पोलीसांचे काम आहे का ? त्यांनी कसे "बंदोबस्त" म्हटले की बंदोबस्त करावा. गृहमंत्री कोणाला व कशाला पोलीस कमिश्नर म्हणून नेमत आहेत हे त्याला पाहण्याची काय गरज होती ? आणि वर मागून मागून लाच मागितली ती सुद्धा किती ? तर फक्त एक कोटी ! अशाने आधीच पांडू हवालदाराचा एवढुसा असलेला , मान , कमी होतो ना ! बरे हसन अली किती लाख कोटींचा मालक आहे हे ह्याला माहीत असताना ह्याने फक्त एकच कोटी मागावे ? मराठी माणसाला कधी विशाल महत्वाकांक्षा येणार अशाने ?
हजार चोर दरवडेखोर सुटले तरी चालतील, पण महाराष्ट्र पोलीसांचा असा अपमान करणार्‍या देशभ्रताराला (देशाच्या बायकोला), चांगलेच वठणीवर आणले पाहिजे. महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद-वाक्य निदान ह्याने तरी लक्षात ठेवायला हवे. "सत-रक्षणाय, खल-निग्रहणाय". म्हणजे सज्जनांचे रक्षण व खळांचे नियंत्रण करणारे हे पोलीस-दल आहे. तीन मुख्यमंत्री हे तर सज्जन आहेतच. ते आपले पैसे ज्याला इतक्या विश्वासाने गुंतवण्यासाठी देतात तो हसन अली ह्याला सज्जन वाटला नाही ? त्याला निलंबितच केले पाहिजे. अशा प्रामाणिक सती-सावित्रीचा आव आणणार्‍या अधिकार्‍यांना राजकारणी भ्रतारांचा इंगा दाखवलाच पाहिजे. अशा खळांना नियंत्रणात ठेवलेच पाहिजे. शिवाय एक कोटीच आणि तेही स्वत:साठीच मागतो काय ? घे आता मिळेल ते !
म्हणतात की जंगलचे राज्य असलेल्या ठिकाणी सुद्धा, जंगलात , वाघांच्या पंजांच्या ठशावरून त्याचा माग काढतात. वाघ किती आहेत, कुठे आहेत हे ताडतात. तसेच, सुशिक्षित समाजात ज्या घटना घडताहेत त्यावरून लोकांनी काळाची पाउले, ओळखायला हवीत व त्याप्रमाणे आपले विचार बदलायला हवेत ! म्हणजे, म्हणजे,...वाघाचे पंजे !


---------अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा